कोपरगाव : डॉक्टरला रुग्णाची नस ओळखता आली तर उपचार योग्य होतात आणि लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या गरजा समजल्या तर विकास योग्य दिशेने होतो. मात्र कोप

कोपरगाव : डॉक्टरला रुग्णाची नस ओळखता आली तर उपचार योग्य होतात आणि लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या गरजा समजल्या तर विकास योग्य दिशेने होतो. मात्र कोपरगाव बसस्थानक उभारताना शहर, प्रवासी आणि व्यावसायिक यांच्या गरजांचा पुरेसा विचार करण्यात आला नसल्याची कडवट टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली. त्यांनी माजी आमदार कोल्हे यांचे नाव न घेता ही टीका केली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून कोपरगाव बस डेपो परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आमदार काळे म्हणाले, जनतेने सेवा करण्याची संधी दिल्यानंतर कोपरगाव शहरातील नागरिक, प्रवासी आणि बस आगाराच्या अडचणी लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून बसस्थानकाच्या दक्षिण बाजूस व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्प्यात असून उत्तरेकडील बाजूस नवीन बस डेपोचे काम सुरू आहे.
भविष्यात इलेक्ट्रिक बसेसची वाढती गरज लक्षात घेऊन बसस्थानकासाठी चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात आले असून, त्यासाठीही आवश्यक कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विविध अडचणींवर मात करत चार्जिंग स्टेशन, काँक्रिटीकरण व बस डेपो यासाठी २० कोटींपेक्षा अधिक निधी दिला असल्याचा दावा त्यांनी केला.
विकासकामांबाबत बोलताना ते म्हणाले, मूलभूत गरजांसह रोजगारनिर्मितीवरही भर देण्यात येत आहे. व्यापारी संकुलाचे काम पूर्णत्वाकडे असून त्यात आणखी एक मजला वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमास बस आगार व्यवस्थापक अमोल बनकर, बसस्थानक व्यवस्थापक अमित हम्पे, विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS