मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिलेला संदेश आता राज्य शासनाच्या निर्णयांमधूनही दिसून येत आहे. मुख्यमंत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिलेला संदेश आता राज्य शासनाच्या निर्णयांमधूनही दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी स्वतः बुलेट चालवत विधानभवनात पेाहोचून पोहोचून इंधन बचतीचा संदेश दिला. तर दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विमानप्रवास करत इंधन बचतीच्या संदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत असल्याने प्रशासन आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनाही साधेपणाचा संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक, कमी इंधन वापर आणि ऊर्जा संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परगावी होणार्या दौर्यांमध्ये मर्यादित वाहनांचा वापर करावा, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांचे प्रस्तावित परदेश दौरे पुढे ढकलण्यात आले असून, विशेष विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, कार्यालयीन कामासाठी विद्युत वाहनांना प्राधान्य देणे आणि वाहन सामायिक वापराची पद्धत राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शक्य तिथे दृकश्राव्य बैठकींचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेनंतर दिवे, पंखे, संगणक आणि वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. वातानुकूलन यंत्रणेचे तापमान चोवीस ते सव्वीस अंशांदरम्यान ठेवण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
मंत्री महाजन, चव्हाणांच्या विमानप्रवासावर विरोधकांची टीका
मात्र दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विमान प्रवासाचे छायाचित्र समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत सरकारच्या काटकसरीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंधन बचतीचे आवाहन एका बाजूला आणि दुसरीकडे विमान प्रवास सुरू असल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

COMMENTS