मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना 1 जुलै

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना 1 जुलै 2026 पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकफलक अर्थात एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे पालन न करणार्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार असून हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी दिली.
राज्यातील वाहनांची ओळख अधिक सुरक्षित, स्पष्ट आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. उच्च सुरक्षा क्रमांकफलकामुळे वाहन चोरी, बनावट क्रमांकफलकांचा वापर आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यास मदत होणार असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात ही अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वी वाहनधारकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यभरात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर अनेक वाहनधारकांना वेळ मिळावा आणि गैरसोय टाळता यावी यासाठी शासनाने मुदत वाढवून 30 जून 2026 पर्यंत केली आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, सर्व वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आगाऊ वेळ निश्चित करावी आणि मुदतीपूर्वी एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी. शासनाने दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन नागरिकांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या सूचनेनुसार, 30 जून 2026 पर्यंत ज्यांनी उच्च सुरक्षा क्रमांकफलक बसवून घेतले नाहीत किंवा नोंदणी केली नाही, अशा वाहनांवर 1 जुलैपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यावर तपासणी करून नियमभंग करणार्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच तडजोड शुल्क म्हणून हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, एजंट किंवा दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन विभागाने केले आहे.

COMMENTS