नांदेड । प्रतिनिधी नागपंचमी सणानिमित्त कंधार तालुक्यातील गुंडा येथील नागोबा देवस्थान नागबर्डी येथे यंदाही भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल
नांदेड । प्रतिनिधी नागपंचमी सणानिमित्त कंधार तालुक्यातील गुंडा येथील नागोबा देवस्थान नागबर्डी येथे यंदाही भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त सोमवार, दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी लालकंधारी जनावरांचे पशुप्रदर्शन आणि खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख तथा कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून, त्यांच्या हस्ते पशुप्रदर्शन व कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागबर्डी देवस्थानच्या वतीने नागपंचमीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, सुभाषराव साबणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रणिताताई देवरे, कंधारचे उपविभागीय अधिकारी व्ही. बी. नरवटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
नागबर्डी देवस्थानच्या यात्रा महोत्सवातील पशुप्रदर्शनात लालकंधारी जनावरांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये वासरू गट, कालवड गट, गाय गट, अदाल वळू, दातीचा वळू तसेच एक वर्षाखालील जनावरांच्या विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटात उत्कृष्ट जनावरांची निवड करून बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक मिळविणार्या जनावरास 3 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 2 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास 1 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS