नांदेड : बीबीएनए असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रावण उत्सव २०२६’ चा शुभारंभ भाजपाच्या युवा नगरसेविका शांभवी साले यांच्या शुभहस्ते उ
नांदेड : बीबीएनए असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रावण उत्सव २०२६’ चा शुभारंभ भाजपाच्या युवा नगरसेविका शांभवी साले यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला. शांभवी साले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वेदोक्त शास्त्रपारंगत पुरोहितांनी शांतिपाठाचे पठण करून कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरणाची जोड दिली.
यावेळी संगीता देशपांडे यांनी शांभवी साले यांचे स्वागत केले, तर श्रावणी पाठक यांनी त्यांचा परिचय करून दिला. उद्घाटनपर भाषणात शांभवी साले यांनी बीबीएनए असोसिएशनच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. स्वदेशी, स्वावलंबन आणि संस्कृती या तीन मूल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या या विचारांशी श्रावण उत्सवाची संकल्पना सुसंगत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी रश्मीताई वडवळकर, अर्चना राजुरकर, संगीता देशपांडे, पुष्पा कोकीळ, सुनील भरड, महेश कोळेश्वर यांची उपस्थिती होती.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उत्सवात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, पूजा साहित्य, पारंपरिक वस्तू, कपडे, इमिटेशन ज्वेलरी तसेच अन्य आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना सणासुदीच्या खरेदीसोबतच स्थानिक व्यावसायिक आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि व्यावसायिकांना ग्राहकांशी थेट संवाद साधता यावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
श्रावण उत्सवाच्या माध्यमातून व्यवसाय, संस्कृती आणि सामाजिक सहभाग यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न बीबीएनए असोसिएशनने केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून नांदेडकरांना आज रविवारी सुद्धा सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत एकाच ठिकाणी विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ उपलब्ध होणार असून, श्रावणातील उत्सवी वातावरणाचा आनंदही घेता येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश राजुरकर यांनी केले, तर रश्मी वडवळकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी बीबीएनएच्या पदाधिकारी व सदस्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. ‘श्रावण उत्सव २०२६’ला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS