पुणे : राज्यातील एका मंत्र्यांच्या विशेष कर्तव्य अधिकार्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप झाला असून, पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकर

पुणे : राज्यातील एका मंत्र्यांच्या विशेष कर्तव्य अधिकार्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप झाला असून, पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विजय धुलचंद कारंडे असे संबंधित अधिकार्याचे नाव असून, ते मंत्री अतुल सावे यांच्याकडे विशेष कर्तव्य अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 30 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कोरेगाव उद्यान परिसरातील निवासस्थानी घडली. पत्नीने त्यांच्या दूरध्वनीतील काही संदेशांबाबत विचारणा करून संकेतांक मागितल्याने वादाची ठिणगी पडली. या कारणावरून संतापलेल्या कारंडे यांनी पत्नीशी वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर मारहाणीला सुरुवात केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, कारंडे यांनी पत्नीवर खेळाच्या दांड्याने वार करत गंभीर दुखापत केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्नीचा गळा आवळून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आईला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या मुलावरही त्यांनी हल्ला केल्याचा आरोप असून, त्यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पीडित महिला व मुलगा यांनी कसाबसा जीव वाचवून घराबाहेर पडत थेट पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून कोरेगाव उद्यान पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक दुखापत करणे आणि धमकी देणे अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी हे नांदेड येथे समाज कल्याण विभागात कार्यरत असून सध्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. या घटनेमुळे घरगुती हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

COMMENTS