पालघर : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पालघर जिल्ह्यात घडलेली एक संतापजनक घटना समोर आली आहे. अघोरी पूजा आण

पालघर : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पालघर जिल्ह्यात घडलेली एक संतापजनक घटना समोर आली आहे. अघोरी पूजा आणि गावठी उपचारांच्या नावाखाली एका 55 वर्षीय भोंदू व्यक्तीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर उपचार शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी शिवराम परशु सावर याच्याशी संपर्क साधण्यात आला. स्वतःला गावरान उपचार करणारा म्हणून ओळख निर्माण केलेल्या या व्यक्तीने अघोरी विधी करून आजार बरा करण्याचे आमिष दाखवले. 3 मे 2026 रोजी आरोपी स्वतःच्या वाहनातून खताडपाडा येथे आला. त्याने फिर्यादी, पीडित मुलगी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना औषध देतो असे सांगून डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात नेले. रात्री उशिरापर्यंत त्याने विविध विधींचे नाटक केल्यानंतर 4 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा औषध आणण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने पीडित मुलगी आणि इतरांना वाहनातून थोड्या अंतरावर नेले. रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून त्याने एका साक्षीदाराला वाहनातच थांबण्यास सांगितले, तर मुलीला एकटीला घेऊन तो जवळच्या जंगलाच्या दिशेने गेला. तेथे मुलीच्या अज्ञानाचा आणि भीतीचा फायदा घेत त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेनंतर कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन मुलीला गप्प बसवण्याचा प्रयत्नही केला. घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. याची माहिती तात्काळ कासा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 64(1),65(1),351(2), सह पोस्को कलम 4(2),8,12 प्रमाणे आरोपी भोंदूवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पालघर पोलिस करत आहेत.

COMMENTS