Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट बाजार समितीत 34 लाखांचा ’सोयाबीन घोटाळा’?शेतकर्‍यांचे पैसे लांबवल्याने संताप; गोडाऊन सील!

किनवट : किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल 32 शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. नाफेडच्या माध्यमातून विक्री क

राष्ट्रीय महामार्गाच्या अतिक्रमण विरोधी विभागचे अंबाई हॉटेला बुलडोझर लावले; आठ दिवसांत आसना ते अर्धापूर तालुक्याची हद्द अतिक्रमण मुक्त करू- राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी
भोकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी 55 लाखांचा मुद्देमाल जप्त
पीपल्स कॉलेज प्राचार्य निवड प्रक्रियेला ‘ब्रेक’; घाईगडबडीच्या निर्णयावर पडदा, एप्रिलमध्ये मुलाखती

किनवट : किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल 32 शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. नाफेडच्या माध्यमातून विक्री केलेल्या सोयाबीनचे 34 लाख 41 हजार 888 रुपये दोन-अडीच महिने उलटूनही न मिळाल्याने शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट बाजार समितीचे गोडाऊन सील केले आहे. याप्रकरणी आता भाजपच्या एका संचालकानेच सचिवांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत बाजार समितीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले होते. येथे 186 शेतकर्‍यांनी 4,034 क्विंटल सोयाबीनची विक्री केली होती. नियमानुसार 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर चुकारे जमा होणे अपेक्षित होते. मात्र, 186 पैकी 32 शेतकर्‍यांचे 646 क्विंटल सोयाबीनचे पेमेंट अद्याप थकीत आहे. पैसे मागायला गेलेल्या शेतकर्‍यांना केवळ ’आज-उद्या’ अशी आश्वासने दिली जात होती. अशातच, बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी आपले मोबाईल बंद करून एकप्रकारे ’फरारी’ पवित्रा घेतल्याने शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला. सोयाबीन नाफेडला न विकता परस्पर विकून त्यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर संशय शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, बाजार समितीचे संचालक नवीन अशोक राठोड यांनी थेट राज्याचे पणन मंत्री राजकुमार रावल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत: नियमबाह्य कामकाज मागील सहा महिन्यांत समितीच्या कार्यकारी मंडळाची एकही सभा झालेली नाही, रेकॉर्डचा अभाव 1 एप्रिल 2024 पासून कामकाजाची अधिकृत नोंद (रेकॉर्ड) व्यवस्थित ठेवलेली नाही, लेखापरीक्षणात त्रुटी 2024 पासून आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण (ऑडिट) पूर्ण झालेले नाही,अंदाजपत्रकाचा अभाव मागील तीन वर्षांपासून समितीचे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले नाही. अशा प्रकारे सचिव रवींद्र राठोड यांनी कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमांचे उल्लंघन केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे धाव घेतल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले. विभागीय अधिकारी आणि सहकार अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वातावरण चांगलेच तापले होते. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी मध्यस्थी केल्यानंतर, बाजार समितीचे सचिव यांना निलंबित करण्याचे आणि येत्या शुक्रवारपर्यंत सर्व शेतकर्‍यांचे थकीत पैसे व्याजासहीत अदा करण्याचे आश्वासन सभापती गजानन मुंडे यांनी दिले. मात्र, आम्ही शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे, मात्र तोपर्यंत बाजार समितीचे गोडाऊन सीलच राहील, अशी ठाम भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात हक्काचे पैसे न मिळाल्याने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले असून, जर दिलेल्या मुदतीत पैसे मिळाले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS