बीड : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते डॉ.योगेश

बीड : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मंगळवारी (दि.9) भेट घेतली. त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, नागरी सुविधा, शेतकरी प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
बीड शहरात मागील काही महिन्यांत आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामध्ये नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बीड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने व आवश्यक यंत्रसामग्रीची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून देत डॉ.क्षीरसागर यांनी या समस्येच्या निराकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तत्काळ संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्हा वार्षिक योजनेतून एक सुसज्ज अग्निशामक वाहन मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाच्या योजनेतून यापूर्वीच मंजूर झालेले, मात्र अद्याप वितरण न झालेल्या दुसर्या वाहनाबाबतही संबंधित विभागाशी चर्चा करून ते लवकर उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले. त्यामुळे लवकरच 2 नवीन अग्निशामक वाहने बीडच्या अग्निशामक दलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यावेळी बीड शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील विविध कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दाही डॉ.क्षीरसागर यांनी उपस्थित केला. या कामांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि जीवितहानीच्या घटनाही घडत असल्याने संबंधित यंत्रणेला निर्देश देऊन कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विविध विकासकामे प्रलंबित असून त्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बीड शहरातील रस्ते व इतर नागरी विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव निधीची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली. बीड विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खासगी बँका, कृषी विभाग आणि महावितरणकडे विविध प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याकडे लक्ष वेधत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्याची विनंतीही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली. याशिवाय मतदारसंघातील विविध विकासकामे, नागरी सुविधा आणि जनहिताच्या प्रश्नांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
मंत्री ना.पंकजाताई मुंडेंसोबत डॉ.योगेश क्षीरसागरांची निवडणुकीसंदर्भात चर्चा
बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक व अन्य विकासकामासंदर्भात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचीही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. बीड मतदारसंघातील विकासकामे आणि मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

COMMENTS