मुंबई: दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित राजीनाम्याचा बनावट (AI-Generated) व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्

मुंबई: दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित राजीनाम्याचा बनावट (AI-Generated) व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, भाजपने भाई जगताप यांनी जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
भाजपचे समाजमाध्यम सहसंयोजक निखील भामरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. नोडल सायबर पोलीस ठाण्यात भाई जगताप यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (IT Act) तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, भाई जगताप यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून दिल्ली पोलिसांचे उपायुक्त सुमित झा यांनी राजीनामा दिल्याचा आभास निर्माण करणारा एक बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर केंद्र सरकारच्या तथ्य पडताळणी यंत्रणेने (PIB Fact Check) तसेच दिल्ली पोलिसांनी याबाबत तात्काळ स्पष्टीकरण दिले. उपायुक्त सुमित झा यांनी कोणताही राजीनामा दिलेला नसून, त्यांच्या नावाने प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला असून त्यातील माहितीला कोणताही अधिकृत आधार नाही. अधिकृत यंत्रणांनी नागरिकांना समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही दृश्य अथवा संदेशावर तत्काळ विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, माहितीची खातरजमा अधिकृत स्रोतांकडून करूनच ती पुढे पाठवावी, असेही सांगण्यात आले आहे.

COMMENTS