बेलापूर : जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिलदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या पार्श्वभूमीवर श्रीर

बेलापूर : जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिलदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील ओढे-नाले, तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा आणि अंतर्गतच्या चाऱ्यांचे व वॉटर कोर्सचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केली आहे.
खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासन व जलसंपदा विभागाने दुष्काळमुक्त अहिल्यानगर जिल्ह्याचा निर्धार केला असून त्यासाठी हा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या कालावधीत जलसंवर्धनासाठी ओढे-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणासारखी कामे हाती घेणे अपेक्षित आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील ओढे-नाल्यांवर शासनाने विविध ठिकाणी दगडी साठवण बंधारे, मृदसंधारणांतर्गत सिमेंट काँक्रिटचे आडवे बांध तसेच अशोक कारखान्याच्या माध्यमातून बंधारे उभारण्यात आले आहेत. मात्र गेल्या तीन दशकांत या बंधाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण झालेले नसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परिणामी या बंधाऱ्यांची पाणी साठवण व पाझरण्याची क्षमता घटल्याचे निदर्शनास येत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील ओढे-नाल्यांचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर प्रवरा डावा व उजवा कालवा तसेच त्यांच्या अंतर्गत असलेल्या चाऱ्यांचे व वॉटर कोर्सचेही खोलीकरण, रुंदीकरण व नूतनीकरण करणे गरजेचे आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या निमित्ताने ही सर्व कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात यावीत, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.

COMMENTS