बारामती/राहुरी: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता मंगळवारी पार पडली. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच

बारामती/राहुरी: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता मंगळवारी पार पडली. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली, तर मंगळवारी बारामतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता झाली. 23 एप्रिलला दोन्ही मतदारसंघात मतदान होणार आहे.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस बारामतीत भावनिक आणि राजकीय ऊर्जेच्या वातावरणात पार पडला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सांगता सभा विशेष ठरली. कार्यकर्त्यांची गर्दी, दादांच्या आठवणी आणि नेत्यांची उपस्थिती यामुळे सभास्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सभेत बोलताना सुनेत्रा पवार यांनी अत्यंत हळव्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझे सर्वस्व हरपले आहे, पण मी खचणार नाही. मी थांबणार नाही आणि मागे हटणारही नाही. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव व्यक्त करत त्यांनी त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला. त्या पुढे म्हणाल्या, मी केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर दादांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले आहे. ही लढाई सोपी नाही, मात्र बारामतीकरांचा विश्वास माझी खरी ताकद आहे. आपल्या दुःखावर मात करत विकासाच्या मार्गावर चालण्याची ग्वाही त्यांनी दिली. अपघात प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करत सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, दोषींना कठोर शिक्षा मिळावी, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभेत अनेक वरिष्ठ नेत्यांनीही सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा दर्शवला.
मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी
बारामतीकरांच्या मनात अजितदादांच्यासाठी अपार श्रद्धा आहे. ही केवळ साथ नाही, तर भावनेने बांधलेली घट्ट नाळ आहे आणि हीच खरी ताकद आहे. अजितदादांच्या पुण्याईने संपूर्ण बारामतीकडून आणि राज्यातून मला आणि माझ्या दोन मुलांना खंबीर पाठिंबा मिळाला. आज मी इथे उभी आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणून नाही, दादांची स्वप्न घेऊन उभी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रणांगणात उतरली आहे. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी असून, ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की माझ्या पाठीशी बारामतीकरांची ताकद असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
अजितदादांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये : मुख्यमंत्री फडणवीस
अजितदादांनी बारामतीमध्ये सुरू केलेले सगळे प्रकल्प सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पूर्ण केले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अजितदादांची आणखी काम करण्याची इच्छा होती. आता आदरणीय सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात हे काम पूर्ण केले जातील. दादांच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात प्रेम आहे. त्यांच्यावर प्रेम दाखवण्याची तारीख आता 23 तारीख आली आहे.23 तारीख दादांना श्रद्धांजली वाहण्याची तारीख असून अजितदादांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

COMMENTS