मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्याव

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पवार यांना काही दिवसांपूर्वीही प्रकृतीच्या कारणास्तव पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवावे लागल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात बोलताना सुळे यांनी स्पष्ट केले की, शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजच्या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांच्यावर सध्या विविध वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या आरोग्याबाबत अधिकृत माहिती देता येईल, असे त्यांनी नमूद केले. याचवेळी पक्षातील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांबाबतही सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. सध्या अशा कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. माझ्या माहितीनुसार हा विषय चर्चेत नाही. परिस्थिती बदलली आहे. आता राज्य व देशासमोरील प्रश्नांकडे लक्ष देणे आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते, असे त्यांनी सांगितले. कुटुंब आणि पक्ष या दोन्ही पातळ्यांवर जबाबदारीची जाणीव असल्याचे नमूद करत सुळे म्हणाल्या की, आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्षम आहेत. पक्षही आमच्यासाठी कुटुंबासारखाच आहे. मात्र सध्या कोणत्याही प्रकारच्या राजकीय एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू नाहीत. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुढील काही तासांत अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता असून, कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

COMMENTS