नांदेड : लोहा येथून कंधारकडे खत घेऊन येणार्या भरधाव ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने महाराणा प्रताप चौकात काही काळ थरारक परिस्थिती निर्माण झाल

नांदेड : लोहा येथून कंधारकडे खत घेऊन येणार्या भरधाव ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने महाराणा प्रताप चौकात काही काळ थरारक परिस्थिती निर्माण झाली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक गतिरोधकावर वळविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत शेकडो नागरिकांचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
ही घटना 5 मे रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. एमएच -12 एन एक्स -1969 क्रमांकाचा खतांनी भरलेला ट्रक लोहा येथून कंधारकडे येत होता. कंधार शहरात प्रवेश करताच ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. ट्रकचा वेग जास्त असल्याने काही क्षणांसाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, दगडसांगवीहून कंधारकडे येणारी एमएच 20 बी एल – 2048 क्रमांकाची एसटी बस महाराणा प्रताप चौकात समोरून येत होती. ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकाने धाडस आणि कौशल्य दाखवत ट्रक बसपासून दूर घेत चौकातील गतिरोधकावर घातला. त्यामुळे एसटी बसमधील प्रवाशांसह चौकातील नागरिकांचा जीव थोडक्यात बचावला. महाराणा प्रताप चौक हा कंधार शहरातील व्यापारी आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला भाग मानला जातो. येथे दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हातगाडे, फळ विक्रेते, ऑटोचालक तसेच ग्राहक यांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती तर जीवितहानीसह लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता होती. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, यापूर्वीही या चौकात दोन ते तीन वेळा गंभीर अपघात घडले आहेत. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. या थरारक घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चौकातील व्यापारी, फळ विक्रेते, हातगाडे चालक आणि नागरिकांनी ईश्वराचे आभार मानत चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. दरम्यान, हे वृत्त लिहीपर्यंत कंधार पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता.

COMMENTS