नांदेड : नांदेड शहरातील स्नेहनगर परिसरात काही पेट्रोल पंपांवरून कॅन, ड्रम आणि कंटेनरच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेलची बेकायदेशीर विक्री होत असल्य

नांदेड : नांदेड शहरातील स्नेहनगर परिसरात काही पेट्रोल पंपांवरून कॅन, ड्रम आणि कंटेनरच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेलची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत असून, याकडे जिल्हा पुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे शहरात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमांनुसार पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या ज्वलनशील पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक करण्यासाठी विशिष्ट सुरक्षा मानके आणि परवानग्या आवश्यक असतात. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी प्लास्टिक कॅन, लोखंडी ड्रम किंवा खासगी कंटेनरमध्ये खुलेआम इंधन भरून दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः दुचाकी किंवा छोट्या वाहनांऐवजी मोठ्या प्रमाणात कॅनमध्ये इंधन भरले जात असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे इंधनाची वाहतूक करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. उन्हाळ्यात वाढलेले तापमान, अपुरी सुरक्षितता, गळती किंवा ठिणगी यामुळे मोठी आग अथवा स्फोट होण्याचा धोका नाकारता येत नाही. गर्दीच्या भागातून अशा प्रकारे इंधन वाहतूक होत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. स्नेहनगर परिसरातील काही नागरिकांनी सांगितले की, दिवसाढवळ्या कॅन आणि कंटेनरमध्ये इंधन भरून नेण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पेट्रोलियम पदार्थांच्या सुरक्षित साठवणूक आणि वाहतुकीसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने कठोर नियम लागू केले आहेत. तरीही स्थानिक पातळीवर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी, अग्निशमन विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अशा बेकायदेशीर इंधन विक्री व वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS