अहिल्यानगर: शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग प्रवर्गाचा लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातून बोगस दिव्यांग प्र

अहिल्यानगर: शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग प्रवर्गाचा लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाथर्डीतील एका शिक्षकासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, अहिल्यानगर येथील पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या राजेश भाऊसाहेब जाधव यांनी प्रथम जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर ते अपात्र ठरल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर आरोपींनी परस्परांशी संगनमत करून सोलापूरचा बनावट पत्ता असलेले ओळखपत्र तयार केले व ११ मे २०२६ रोजी युडीआयडी (UDID) प्रणालीद्वारे सोलापूर येथून ऑनलाइन अर्ज दाखल केला. पोलिसांच्या तपासानुसार, आवश्यक कागदपत्रांची कोणतीही योग्य पडताळणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी न करताच २० मे २०२६ रोजी ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले. हे प्रमाणपत्र संबंधित शासकीय विभागात सादर करून नोकरीचा तसेच पदोन्नतीचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप आहे.
याप्रकरणी दिव्यांग संघटनांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालात कोणतीही वैद्यकीय तपासणी न करताच हे प्रमाणपत्र जारी झाल्याचे स्पष्ट समोर आल्यानंतर संबंधित प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आणि पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व भरत चंदनशिव यांच्या पथकाने कारवाई करत राजेश भाऊसाहेब जाधव (कनिष्ठ लिपिक), महेश दिनकर बारगजे, राजेश रमाकांत ढवण (निवृत्त रुग्णालय कर्मचारी) आणि पाथर्डी येथील शिक्षक विजय बाबासाहेब गर्जे या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS