श्रीगोंदा : घारगावनजीक देव नदीलगत पिंपळगाव पिसा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेली उघडी विहीर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असून,
श्रीगोंदा : घारगावनजीक देव नदीलगत पिंपळगाव पिसा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेली उघडी विहीर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असून, या ठिकाणी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ऍड. संपत इधाटे यांनी केली आहे.संरक्षक कठडा नसलेली विहीर नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करत आहे. या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
नगर–दौंड महामार्गापासून सुमारे ५०० फूट अंतरावर असलेल्या या रस्त्याच्या उत्तर बाजूस सदर विहीर असून दक्षिण बाजूस देव नदीचे खोल पात्र आहे. रस्ता तुलनेने अरुंद असल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अधिक धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि पादचारी यांना या ठिकाणी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सध्या विहिरीभोवती केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे जाळे व इशारा दर्शविणारी चिन्हे लावण्यात आली आहेत. मात्र ही व्यवस्था अपुरी असल्याने मोठा अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडील माती खचण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वीही संबंधित विभागाकडे तक्रारी करून सुरक्षेसाठी मजबूत संरक्षण भिंत, लोखंडी कठडे, परावर्तक फलक आणि इशारा दिवे बसविण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, असे ऍड. संपत इधाटे यांनी सांगितले.
दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.
“अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी.” – ऍड. संपत इधाटे

COMMENTS