Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजप विजय आणि काॅंग्रेस पराभवाची मिमांसा!

 भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीए आघाडीने २०१४ मध्ये पूर्ण बहुमताने सत्ता प्राप्त केली. या काळात भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय नेते होते,

‘आप’ चा निर्णय ओबीसींच्या दृष्टीने!
दिल्लीचा राज्य दर्जाचा विवाद! 
अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….

 भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीए आघाडीने २०१४ मध्ये पूर्ण बहुमताने सत्ता प्राप्त केली. या काळात भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय नेते होते, त्यांचा सर्वात आधी नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत बाबीतून एक प्रकारे पराभव केला होता. नितीन गडकरी यांचा पुर्ती घोटाळा गोवा अधिवेशनाच्या दरम्यानच काढण्यात आला होता. त्यातून पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीतून आणि पर्यायने पुढे केंद्रीय सत्तेच्या नेतृत्वातून नितीन गडकरी यांना मागे सरावे लागले! ज्या अडवाणी यांना गुरुचे स्थान मोदींनी दिले होते, त्यांना बहुमत मिळताच मोदींनी कशाप्रकारे दुर्लक्षित केले, हे सर्व ज्ञात आहे! त्यानंतर भाजपामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याचे नेतृत्व आणि आवाज, हा एक प्रकारे बंद झाला. मात्र, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा पराभव करण्याइतपत भारतीय जनता पक्षाने जनमानसात आपले स्थान मिळवलेले नव्हते; तर, प्रसारमाध्यमांनी जी विकास पुरुष म्हणून मोदींची प्रतिमा निर्माण केली,  त्या माध्यमातून ‘अच्छे दिन’ चे बिरुद्ध लावले गेले, या गोष्टींना भारतीय मतदार भुलला.  त्याने भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिले. या काळात काँग्रेसने काँग्रेसचा पराभव केला, हाही प्रकार आपल्याला दिसला. कारण, काँग्रेसमध्ये देखील जेष्ठ नेते आणि युवा नेते अशी एक प्रकारे अनपेक्षित फळी निर्माण झाली होती. ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधीच्या नेतृत्वात काम करण्यास अंतर्गत पातळीवर नकार दिलेला होता. याचे मुख्य कारण, जर, राहुलचे नेतृत्व २०१४ मध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मान्य केले असते, तर, त्याचवेळी निम्मी काँग्रेस रिकामी झाली असती. कारण, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नवी फळी नेतृत्वस्थानी आली असती. हेच जुन्या नेत्यांना खटकले होते. त्यामुळे काँग्रेस अंतर्गतच काही लोकांनी राहुल गांधी यांची प्रतिमा भंजन करण्याचं काम करायला भाजपाला मदत केल्याचे आजही बोलले जाते! याचा अर्थ काँग्रेसने काँग्रेसचा पराभव केला, ही बाब देखील त्या काळात लागू पडली असली तरीही, काँग्रेसचा शक्तिक्षय या काळात पूर्णपणे झालेला होता! परंपरागत काँग्रेसचे मतदार म्हणून एससी, एसटी, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्यांक या जातीसमूह होत्या. मात्र, एक एक करून या जात समूहांनी किंवा प्रवर्गांनी काँग्रेसची साथ सोडली होती. जर, आपण एससी मतांना पाहिलं तर, अखिल भारतीय पातळीवर बहुजन समाज पक्षाने काँग्रेसच्या वोट बँकेतून शेड्युल कास्ट किंवा अनुसूचित जाती या प्रवर्गाला पूर्णपणे बाहेर आणले होते. त्यामुळे काँग्रेसची मोठी वोट बँक या प्रवर्गाच्या माध्यमातून संपली होती. हा मोठा प्रवर्ग असल्यामुळे यानंतर काँग्रेस प्रत्येक राज्यात कमजोर होत गेली.  मग दुसऱ्या टप्प्यावर एम आय एम या पक्षाचाही एक प्रभाव देशभर मुस्लिम समुदायांमध्ये किंबहुना वरच्या मुस्लिम जात समुहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला. अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी प्रवर्ग. या समूहामध्ये आरएसएसने वनवासी कल्याण आश्रम आणि इतर संस्थांच्या माध्यमातून घुसखोरी केली होती. आदिवासी समुदायाला अखिल भारतीय पातळीवर आर एस एस ने एकाच गोष्टीभोवती केंद्रित केले; ते म्हणजे, भारतीय संविधानात आदिवासींना आदिवासी हे संबोधन नाही! त्याचबरोबर ॲबओरिजन किंवा मूलनिवासी हे संबोधन देखील नाही. त्यामुळे संविधानातील पाचवी आणि सहावी सूची अंतर्गत या समूहाला विशेष अधिकार प्राप्त होऊनही, अनुसूचित क्षेत्रातील विशेष राजकीय अधिकार प्राप्त होऊनही ते आरएसएसच्या या मुद्द्यातून संविधानकारांचे विरोधक बनले! अर्थात ही बाब आता मणिपूरच्या घटनाक्रमानंतर आदिवासी समुदायाच्या लक्षात आली आहे की, आर‌एस‌एस आदिवासी समुदायाच्या जीवावर उठला‌. परंतु, आतापर्यंत आदिवासींना काँग्रेसच्या मागून खेचून आरएसएस ने त्यांच्यामध्ये राज्य पातळीवर छोटे – छोटे पक्ष निर्माण केले. या पक्षांना एक गठ्ठा आदिवासींचीच मते मिळत असल्यामुळे पक्ष बदल झाला तरी नेत्यांना फरक पडला नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून बाहेर पडलेले आदिवासी नेते अपक्ष उभे राहिले तरी, आदिवासी क्षेत्रातून निवडून आले.  काँग्रेसच्या विरोधात ओबीसी हा घटक प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या मागे उभा राहिला. तसा तो महाराष्ट्रातही शिवसेनेच्या मागे उभा राहिला. परंतु, कोणत्याही पक्षाच्या मागे गेल्यानंतरही त्या पक्षाचे नेतृत्व किंवा मुख्यमंत्रीपद हे त्या राज्यातील रूलिंग कास्टकडेच किंवा वरच्या जातींकडे जाते;  जसे महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर आली तेव्हा, मनोहर जोशी आणि नारायण राणे या अनुक्रमे ब्राह्मण आणि मराठा व्यक्तीला मुख्यमंत्रीपद मिळाले. अर्थात, ओबीसी घटकही काँग्रेस पासून खूप आधीच तुटला. त्यामुळे या समुदायांना सांभाळण्यात काँग्रेसला आलेले अपयश, हेच काँग्रेसच्या पराभवाचे कारण बनले. काँग्रेसला पराभवाचे हे कारण आजही कळले आणि त्यांनी या समुदायाला आपल्याकडे सन्मानाने बोलविण्याची भूमिका घेतली तर, आगामी काळात काँग्रेस पराभवाच्या गर्तेतून विजयाच्या शिखराकडे नक्कीच कुच करू शकते! यात कोणतीही शंका नाही.

COMMENTS