नांदेड : शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, मुख्य रस्त्यांवरील बंद पथदिवे आणि निष्काळजी व्यवस्थापनामुळे नागरिकांमध्ये महावितरणविरोधात तीव्र

नांदेड : शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, मुख्य रस्त्यांवरील बंद पथदिवे आणि निष्काळजी व्यवस्थापनामुळे नागरिकांमध्ये महावितरणविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा होत नसल्याने वाहनधारक, व्यापारी आणि सामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विशेषतः मालेगाव रोडसह शहरातील प्रमुख मार्गांवर रात्री अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी विविध दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली कामे अद्याप अपूर्णच आहेत. झाडांच्या फांद्या तोडणे, लाईन दुरुस्ती, तांत्रिक तपासणी या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र त्याबाबत ग्राहकांना पूर्वसूचना दिली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शिवाजीनगर, श्रीनगर ते वर्कशॉप परिसर, राज कॉर्नर ते तरोडा नाका, तसेच मालेगाव रोड या भागातील मुख्य रस्त्यांवरील विद्युत खांबांवरील दिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करणार्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांवरील खड्डे, अंधार आणि वेगाने धावणारी वाहने यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रविवारी रात्री वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक भागातील वीजपुरवठा मध्यरात्रीपर्यंत खंडित होता. काही वस्त्यांमध्ये रात्रभर वीज नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. नियमितपणे वीजबिल भरूनही दर्जाहीन सेवा मिळत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मालेगाव रोड परिसरातील काही डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) चोवीस तास उघड्या अवस्थेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या डीपीमध्ये कोणीही सहज प्रवेश करून फ्यूज लावणे, काढणे किंवा छेडछाड करणे शक्य होत असल्याने मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, नागरिक किंवा अनधिकृत व्यक्तींच्या संपर्कात आल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने तातडीने बंद पथदिवे सुरू करावेत, उघड्या डीपींना सुरक्षित ग्रिल बसवाव्यात, तांत्रिक बिघाड दुरुस्त करावेत आणि ग्राहकांना पूर्वसूचना देण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे

COMMENTS