बीड : वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे बीडचे ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ तथा सोनाजीराव क्षीरसागर होमिओ

बीड : वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे बीडचे ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ तथा सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व विभागप्रमुख प्रा. डॉ. शेख अतिक लतीफ यांना यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘आदर्श आरोग्यदूत जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त युवा लोकमित्र परिवाराच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
डॉ. शेख अतिक लतीफ यांनी गेल्या ३० वर्षांपासून रुग्णसेवा, अध्यापन आणि सामाजिक कार्याचा वसा जपला आहे. यापूर्वी त्यांना ‘आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार २००६’, ‘राज्यस्तरीय मौलाना आझाद सेवादूत पुरस्कार २०२३’, आणि ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स २०२४’ यांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक येथे रिसर्च सेंटरचे चेअरमन म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.
कोविड-१९ महामारीच्या काळात ‘आर्सेनिक-३०’ या होमिओपॅथिक औषधाच्या वितरण मोहिमेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती, ज्यासाठी त्यांना ‘कोविड योद्धा पुरस्कार’ मिळाला होता. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी काकू नाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान, आणि वृक्षारोपण मोहिमांमध्ये मोठे योगदान दिले आहे.
हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बीड येथील ताज पॅलेस, कादरपुरा, बार्शी नाका येथे संपन्न होणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS