नांदेड: जिल्हा परिषदेतील शिक्षक सुनील मोरे यांनी स्वतःच्या दोन चिमुकल्या अपत्यांची हत्या करून आत्महत्या केल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर आता य

नांदेड: जिल्हा परिषदेतील शिक्षक सुनील मोरे यांनी स्वतःच्या दोन चिमुकल्या अपत्यांची हत्या करून आत्महत्या केल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर आता या प्रकरणाचे तीव्र पडसाद शिक्षण विभागात उमटले आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईलवरील स्टेटस आणि यापूर्वी दिलेल्या लेखी तक्रारीत वरिष्ठांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा स्पष्ट उल्लेख केल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांकडून या संदर्भातील अहवाल मागविण्यात आल्याची माहिती समोर येत असून, संबंधित तक्रारीवर वर्षभर कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही, यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुनील मोरे यांनी वर्षभरापूर्वीच वरिष्ठ अधिकार्यांविरोधात मानसिक छळ, प्रशासकीय अन्याय आणि भ्रष्टाचारासंदर्भात लेखी तक्रार दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या तक्रारीची वेळेत दखल घेण्यात आली नाही किंवा चौकशी पुढे सरकली नाही, असा आरोप होत आहे. जर त्या वेळी तक्रारीची निष्पक्ष चौकशी झाली असती, तर ही अत्यंत दुर्दैवी वेळ आली नसती, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
मोरे यांनी आपल्या पत्रात वारंवार निलंबनाच्या धमक्या देणे, दुर्गम भागात बदली करणे, स्वतःवर आणि पत्नीवर अतिरिक्त कामाचा ताण टाकणे, तसेच सातत्याने मानसिक खच्चीकरण केल्याचा गंभीर आरोप केला होता. याशिवाय महिला शिक्षिकांना बालसंगोपन रजा नाकारणे, वेतनासंबंधी कथित अनियमितता आणि शिक्षकांकडून सक्तीने पैसे वसूल केल्याचेही आरोप त्यांनी केले होते.
या प्रकरणात पोलीस तपासाची व्याप्ती वाढली असून, संबंधित प्रशासकीय अधिकार्यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने तक्रारीवर काय कारवाई केली, चौकशी का रखडली आणि जबाबदार अधिकार्यांची भूमिका काय होती, याचा सविस्तर तपशील पोलिसांकडून मागविला जात आहे. या वेदनादायी घटनेमुळे शिक्षण विभागाच्या तक्रार निवारण यंत्रणेतील ढिसाळपणा चव्हाट्यावर आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

COMMENTS