नांदेड : राज्यासह देशभरात तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला असून नागरिकांनी आगामी काही दिवस अत्यंत सावध राहण्याचे आवाहन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.
नांदेड : राज्यासह देशभरात तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला असून नागरिकांनी आगामी काही दिवस अत्यंत सावध राहण्याचे आवाहन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य यांनी केले आहे. सध्या जाणवत असलेली उष्णता ही नेहमीची उन्हाळी परिस्थिती नसून, ती जीवघेण्या उष्णतेच्या लाटेची गंभीर चाहूल असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
डॉ. वैद्य म्हणाले की, जागतिक स्तरावर तापमानात मोठी वाढ होत असून भारतातील अनेक शहरे अत्यंत उष्ण शहरांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा परिसरात उष्णतेचा तीव्र तडाखा बसत असून काही ठिकाणी तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातामुळे मृत्यूच्या घटनाही समोर येत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. ते पुढे म्हणाले, घाबरण्याचे कारण नसले तरी सतर्कता आणि दक्षता अत्यावश्यक आहे. ही उष्णतेची लाट निरोगी व्यक्तींनाही धोकादायक ठरू शकते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, उघड्यावर काम करणारे मजूर, शेतकरी, वीटभट्टी कामगार तसेच मधुमेह, हृदयरोग, दमा, मूत्रपिंड विकार, रक्तक्षय व कर्करोगग्रस्त रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले. सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंतच बाहेरील कामे पूर्ण करावीत. सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास पांढरे, सैल व सुती कपडे परिधान करावेत. डोक्यावर रुमाल, टोपी, ओढणी किंवा छत्रीचा वापर करावा. तहान लागण्याची वाट न पाहता वारंवार पाणी पिणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये व कार्यालयांनी कामकाजाच्या वेळेत बदल करून सकाळ-संध्याकाळ सत्राचा विचार करावा, असेही त्यांनी सुचवले. तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, घाम येणे बंद होणे, त्वचा कोरडी पडणे, अशक्तपणा, अंधूक दिसणे, गोंधळणे किंवा बेशुद्ध होणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित सावलीत आणावे, ओल्या कपड्याने शरीर पुसावे, डोक्यावर थंड कपडा ठेवावा आणि तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. दही, ताक, मठ्ठा, लस्सी, उसाचा रस, फळांचे रस, लिंबूपाणी तसेच टरबूज, खरबूज, द्राक्षे, पपई यांसारखे जलयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करावेत. शिळे, सडके किंवा दूषित अन्न टाळावे.वाहने शक्यतो सावलीत उभी करावीत. गाडीत मुले एकटी सोडू नयेत. गॅस, लायटर, बॅटरी, स्प्रे यांसारख्या ज्वलनशील वस्तू वाहनात ठेवू नयेत. मोबाईलचा वापर व चार्जिंगही मर्यादित ठेवावे. उन्हामुळे भटके प्राणी, पक्षी व सर्प थंड जागेच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात. त्यामुळे परिसरात पाण्याची भांडी ठेवून त्यांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी डॉ. वैद्य म्हणाले, भिऊ नका, पण बेफिकीरही राहू नका. स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या. दक्षता हाच या उष्णतेवर मात करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

COMMENTS