Homeताज्या बातम्या

आष्टी पोलिसांची धडक कारवाई; २४३ गुन्ह्यांतील ७.८४ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट!

आष्टी: अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी आष्टी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या तब्बल २४३ गुन्ह्यांमध

महाराष्ट्राच्या जनतेची मालमत्ता राखा !
जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; बेट-कोपरगाव येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
किनवट जवळील अंबाडीत धक्कादायक प्रकार; महिला सरपंचाचा विनयभंग करत सासर्‍यांसह बेदम मारहाण

आष्टी: अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी आष्टी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या तब्बल २४३ गुन्ह्यांमधील ७ लाख ८३ हजार ९७८ रुपयांचा जप्त मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई २० जुलै २०२६ रोजी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी ही मोहीम राबवली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आष्टी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी १ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २३५ गुन्हे न्यायालयीन आदेशानुसार, तर १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे ८ गुन्हे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या परवानगीनंतर निकाली काढण्यात आले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची आवश्यक परवानगी घेऊन जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याचा नाश करण्यात आला.

ही संपूर्ण प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पंच आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. जप्त करण्यात आलेल्या दारूचा नाश करताना सर्व कायदेशीर नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी. जी. देवकाते, दुय्यम निरीक्षक आय. बी. मुल्ला आणि त्यांच्या पथकानेही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. आष्टी पोलिसांनी अवैध दारूविरोधात राबवलेल्या या धडक मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत असून, भविष्यातही अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

COMMENTS