Homeताज्या बातम्या

उपळी येथे स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन महिला पत्रकार संघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक प्रतिसाद

बीड: कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील उपळी येथे स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यात

संगमनेरमध्ये खनानारळाच्या ओटीने प्रवरानदीचे जलपूजन
एस.के.एच. वैद्यकीय महाविद्यालयात अजितदादा पवार यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवेचे आवाहन
सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड: कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील उपळी येथे स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी महिला पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. उपळी हे परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून येथे दररोज बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि विविध शासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, जवळपास स्वतंत्र पोलीस चौकी नसल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने पोलीस मदत मिळण्यात विलंब होतो. विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर महिला पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष तथा ’लोकजगत’च्या संपादक शेख आयशा आणि संघटनेच्या रुपाली कचरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात उपळी व परिसरातील वाढती लोकसंख्या, वाढणारी वर्दळ आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना त्वरित पोलीस मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही चौकी अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाकडून प्रस्तावाची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. महिला पत्रकार संघाने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्राधान्याने मांडत स्वतंत्र पोलीस चौकीच्या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे. या मागणीला परिसरातील नागरिकांसह विविध महिला संघटनांनीही पाठिंबा दर्शविला असून, पालकमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनामुळे उपळी येथे लवकरच स्वतंत्र पोलीस चौकी सुरू होण्याबाबत नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

COMMENTS