शेवगाव : बोधेगाव (ता. शेवगाव) येथील वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत तिच्या वडिलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दा
शेवगाव : बोधेगाव (ता. शेवगाव) येथील वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत तिच्या वडिलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बोधेगाव येथे वसतिगृहात वास्तव्यास होती. ६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता कुशाबा पलाटे याने जेवणाचा डबा देण्याच्या कारणावरून मुलीला आपल्या खोलीत बोलावून घेतले. खोलीचा दरवाजा आतून बंद करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी ८ ऑगस्ट रोजी कुशाबा पलाटे याला जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच प्रतीक पलाटे याने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बाळासाहेब रामनाथ मराठे (वय ३२, रा. पवळाची वाडी, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ मधील कलम ८, १२ व १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात कुशाबा पलाटे, प्रतीक पलाटे, पियुष कुशाबा पलाटे आणि प्रणव पलाटे (सर्व रा. बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालय, शेवगाव येथे करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील परिस्थिती सध्या शांत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

COMMENTS