राहाता: राहाता वकील संघाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. प्रकाश डी. बेंद्रे यांची बिनविरोध व बहुमताने निवड झाली आहे

राहाता: राहाता वकील संघाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. प्रकाश डी. बेंद्रे यांची बिनविरोध व बहुमताने निवड झाली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून उपाध्यक्षपदी ॲड. सचिन वाघ, महिला उपाध्यक्षपदी ॲड. कल्याणी होले, सचिवपदी ॲड. प्रकाश गागरे आणि सहसचिवपदी ॲड. अभिजित काळे यांची बिनविरोध निवड झाली.
अध्यक्ष व खजिनदार या प्रमुख पदांसाठी २४ जुलै रोजी मतदान घेण्यात आले. संघाच्या एकूण २६९ मतदारांपैकी २६२ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी ॲड. प्रकाश बेंद्रे आणि ॲड. चांगदेव धनवटे यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये ॲड. बेंद्रे यांनी १५९ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. तर खजिनदारपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. उल्हास कालेकर यांनी १३६ मते मिळवून ॲड. अक्षय गायकवाड यांचा पराभव केला.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. भाऊसाहेब पुलाटे यांनी काम पाहिले. सहनिवडणूक अधिकारी म्हणून माजी उपाध्यक्ष ॲड. अजित खर्डे, माजी खजिनदार ॲड. प्रविण सापते आणि माजी महिला उपाध्यक्ष ॲड. कविता भालके यांनी जबाबदारी पार पाडली. निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पडली असून, नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून व सामाजिक क्षेत्रांतून अभिनंदन केले जात आहे.
दरम्यान, आपल्या निवडीनंतर बोलताना, “राहाता तालुका वकील संघाच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू. न्यायालयीन सुविधांच्या उभारणीसाठी आणि वकिलांच्या हिताच्या विविध प्रश्ना सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. प्रकाश बेंद्रे यांनी केले.

COMMENTS