परळी : परळी येथील ३६ वर्षीय तोहीद खान उर्फ अफजल खान यांची आर्थिक वादातून ३१ मे २०२६ रोजी हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याच्या घटनेन

परळी : परळी येथील ३६ वर्षीय तोहीद खान उर्फ अफजल खान यांची आर्थिक वादातून ३१ मे २०२६ रोजी हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष ना. समीर काझी यांनी परळी येथे भेट देऊन खान कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी राज्य वक्फ बोर्डाच्या वतीने कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते.
जाहीर केलेली ही मदत शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. ना. समीर काझी यांनी दिलेला शब्द पाळत राज्य वक्फ बोर्डाच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश तोहीद खान यांच्या पत्नी व वडिलांकडे प्रदान केला.
छोटेखानी कार्यक्रमात धनादेश सुपूर्द करताना ना. समीर काझी यांनी सांगितले की, राज्य वक्फ बोर्ड मुस्लिम बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील गरजू कुटुंबांना शक्य तेवढी मदत करण्याचा बोर्डाचा प्रयत्न असून, तोहीद खान यांच्या कुटुंबीयांना भविष्यातही आणखी मदत करता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच माणुसकीच्या भावनेतून विविध सामाजिक संस्था व घटकांच्या माध्यमातून खान कुटुंबीयांना अतिरिक्त मदत मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी के.एस.बी.एल. उद्योगसमूहाचे संचालक शकीलभाई बागवान, अतुलभाई संघानी यांच्यासह परळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, खान कुटुंबीयांना दिलेला शब्द पूर्ण करून प्रत्यक्ष आर्थिक मदत सुपूर्द केल्याबद्दल परळीतील मुस्लिम बांधवांनी ना. समीर काझी तसेच राज्य वक्फ बोर्डाचे आभार व्यक्त केले.

COMMENTS