किनवट : शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि योजना कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवार, 10 ऑगस्ट रोजी किनव

किनवट : शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि योजना कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवार, 10 ऑगस्ट रोजी किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. किसान सभेचे नेते कॉ. अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी व कामगार सहभागी झाले होते. हुतात्मा गोंडाराजे मैदान येथून जोरदार घोषणाबाजीत रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून चर्चा केली. या वेळी सहाय्यक जिल्हाधिकार्यांनी स्थानिक मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले असून वरिष्ठ स्तरावरील मागण्यांबाबत संबंधित विभागांशी पाठपुरावा करण्याचे मान्य केले. आंदोलनस्थळी झालेल्या सभेला संबोधित करताना कॉ. अर्जुन आडे यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली. सध्याचे सरकार हे श्रमिकविरोधी असून त्यांना कष्टकर्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. देशातील संपत्ती अदानी-अंबानींसारख्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. आगामी काळात हे सरकार बदलण्यासाठी शेतकरी आणि कामगारांनी एकजूट होऊन संघर्ष तीव्र करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या आंदोलनात नियमित कर्जदार शेतकर्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान, थकीत कर्जमुक्ती, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचा कायदा, पीक विमा परतावा आणि 12 तास मोफत वीज, वन, गायरान व देवस्थान जमिनीची शेतकरी-शेतमजुरांना मालकी, रोहयो अंतर्गत मजुरांना काम आणि तालुक्यात सिंचन तलावांची निर्मिती, चार श्रमसंहिता व स्मार्ट मीटर रद्द करणे, योजना कर्मचार्यांना किमान वेतन देणे आणि भारत-अमेरिका व्यापारी करार रद्द करणे, किनवट जिल्हा निर्मितीसह आदिवासी व वंचित घटकांच्या विविध मागण्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जनार्दन काळे, शेषराव ढोले, शैलीया आडे, सुनिता बोणगीर, आडेलू बोणगीर, इरफान पठाण, सिताराम आडे, अंबर चव्हाण, तानाजी राठोड, मोहन जाधव, मनोज सल्लावार, इंदल राठोड, शेख फरीद बाबा, शेख चांद, नंदू मधुकर, इंदुताई डोंगरे, शिवाजी किरवले, विजय जाधव, रंगराव चव्हाण, सुदाम बर्गे, प्रशांत जाधव, साईनाथ राठोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS