नांदेड : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुसज्ज महापालिका दवाखाना सुरू करण्याची मागणी शिवसेने
नांदेड : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुसज्ज महापालिका दवाखाना सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक सुहास बालाजीराव कल्याणकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. नागरिकांच्या आरोग्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडत त्यांनी प्रशासनाचे लक्ष प्रभागातील आरोग्य सुविधांच्या गरजेकडे वेधले. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सध्या स्वतंत्र महापालिका दवाखाना उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी प्रभाग क्रमांक 2 मधील महापालिका दवाखान्यावर अवलंबून राहावे लागत आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी चांगली सेवा देत असले तरी प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांसाठी त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे कल्याणकर यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्थानिक पातळीवरील आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. किरकोळ आजार, प्राथमिक तपासणी, नियमित औषधोपचार तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनासाठी नागरिकांना दुसर्या प्रभागात जावे लागू नये, यासाठी प्रभागात स्वतंत्र दवाखाना सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रस्तावित दवाखान्यात केवळ नाममात्र सुविधा न ठेवता पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित परिचारिका, आवश्यक औषधसाठा, प्राथमिक तपासणी सुविधा आणि मूलभूत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली. दवाखाना सुरू केल्यानंतर त्याचे नियमित संचालन, औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय कर्मचार्यांची उपस्थिती याकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, नगरसेवक योगेश मुंडे यांनीही या मागणीला ठाम पाठिंबा दर्शविला. दोन्ही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक 1 मधील आरोग्य सुविधेचा प्रश्न प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून त्या सभागृहात मांडणारे संवेदनशील आणि लोकाभिमुख नगरसेवक म्हणून सुहास कल्याणकर यांच्या भूमिकेचे प्रभागातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. आरोग्यसेवा ही नागरिकांची मूलभूत गरज असून ती त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावी, या भूमिकेतून त्यांनी केलेल्या मागणीबद्दल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुसज्ज महापालिका दवाखाना सुरू करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना ‘उपचारासाठी दूर जाण्याऐवजी आरोग्यसेवा आपल्या परिसरातच’ उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

COMMENTS