Homeताज्या बातम्या

20 वर्षांच्या अतिक्रमणाला अखेर ‘ब्रेक’; भोकरच्या मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास!

भोकर : गेल्या दोन ते अडीच दशकांपासून भोकर शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवर ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणांना अखेर प्रशासनाने ‘ब्रेक’ लावला आ

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
आ. विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली फारूख पटेल यांनी पटेल नगर भागाची पाण्याची समस्या दूर केली :- शेख युनूस
देगलूर नगर परिषदेचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; लोकसहभागाचे आवाहन

भोकर : गेल्या दोन ते अडीच दशकांपासून भोकर शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवर ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणांना अखेर प्रशासनाने ‘ब्रेक’ लावला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय, बसस्थानक परिसर, नगरपरिषद परिसर, किनवट रोड तसेच जुने भोकर येथील विविध भागांत प्रशासनाने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या कारवाईमुळे शहरातील प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात मोकळे झाले असून, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या ये-जा करण्यातील अडथळे दूर झाले आहेत. विशेष म्हणजे, ही कारवाई कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि सामंजस्याने पार पडली. भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संयमाची भूमिका घेत कारवाईला प्रभावी सुरक्षा दिली. प्रशासनाने अतिक्रमणधारकांना यापूर्वीच नोटिसा बजावून 24 तासांच्या आत स्वतःहून अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर संबंधित व्यावसायिक आणि पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा झाली. काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःची दुकाने, पानपट्ट्या, हॉटेलमधील साहित्य आणि इतर बांधकामे हटविली. मात्र, काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी पुढाकार न घेतल्याने प्रशासनाला जेसीबीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कारवाई करावी लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्थानक, नगरपरिषद परिसर, किनवट रोड, जुने भोकर येथील जुने पोस्ट ऑफिस परिसर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील नाल्यांबाहेरील जागा तसेच मार्केट कमिटीच्या अखत्यारितील जागांवर झालेली अनधिकृत बांधकामे, दुकाने, पानपट्ट्या, हॉटेल्स, कपड्यांची दुकाने आदींवर कारवाई करण्यात आली. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर सुरू असलेल्या व्यवसायांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. पादचार्‍यांनाही रस्त्यावरून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यामध्ये 1 डीवायएसपी, 6 पोलीस निरीक्षक, 22 एपीआय/पीएसआय, 20 महिला पोलीस कर्मचारी, 100 पुरुष पोलीस कर्मचारी तसेच नांदेड येथील दंगा नियंत्रण पथकाची दोन पथके तैनात करण्यात आली होती. मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे कारवाईदरम्यान परिस्थिती नियंत्रणात राहिली. पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत कारवाई शांततेत पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या अतिक्रमण हटाव मोहिमेतील विशेष बाब म्हणजे प्रशासनाने कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा प्रभावशाली व्यक्तीला झुकते माप दिले नसल्याचे दिसून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील भाजपचा झेंडा आणि कमळ चिन्ह असलेला स्तंभदेखील जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला. त्यामुळे अतिक्रमण कारवाई करताना राजकीय पक्ष, व्यक्ती किंवा प्रभावाचा विचार न करता नियमांनुसार कारवाई करण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे काही नागरिकांनी स्वागत केले आहे. एकीकडे रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे अनेक वर्षांपासून याच ठिकाणी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्‍या छोट्या व्यावसायिकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई आवश्यक असली, तरी संबंधित गरजू व्यावसायिकांसाठी पर्यायी जागा अथवा पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासनाने संवेदनशीलतेने हाताळावा, अशी मागणी होत आहे. अतिक्रमण हटविणे ही एकदाच होणारी मोहीम न राहता त्यानंतरची देखरेख अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पूर्वी अनेकदा अतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसांतच त्याच ठिकाणी पुन्हा दुकाने, हातगाड्या आणि इतर व्यावसायिक साहित्य उभे राहिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ‘अतिक्रमण हटविले’ एवढ्यावर प्रशासनाने समाधान न मानता ‘अतिक्रमण पुन्हा होऊ न देणे’ हे पुढील आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे. नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने नियमित पाहणी करून पुन्हा अतिक्रमण करणार्‍यांवर तातडीने कारवाई केली, तरच भोकरचे रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त राहतील. दोन दशकांहून अधिक काळ रखडलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने घेतलेली धडक भूमिका नागरिकांसाठी दिलासादायक ठरली असली, तरी आता ही कारवाई सातत्याने सुरू राहते का, याकडे भोकरकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS