Homeताज्या बातम्यादेश

देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा : सुजाता शर्मानागरिकांनी ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार हो

पेट्रोल-डिझेल तीन रूपयांनी महागलेनव्या दरांमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक ताण
डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण
पंतप्रधानांनी ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमीकेवळ दोन गाड्या घेऊन पोहोचले कॅबिनेट बैठकीला


नवी दिल्ली : पश्‍चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. या परिस्थितीचा परिणाम जगभरातील इंधन पुरवठा व्यवस्थेवर होत असला, तरी भारतात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये, तसेच ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने केले आहे.
मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जागतिक परिस्थिती गंभीर असली तरी भारताने वेळेवर उपाययोजना केल्यामुळे देशात इंधनटंचाईची कोणतीही शक्यता नाही. देशातील सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा सुरू असून कोणत्याही भागात कमतरता निर्माण झालेली नाही. स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीतपणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे महत्त्व पटवून देत शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करणे, मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य देणे आणि पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ऊर्जा संवर्धन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत घरगुती गॅससाठी सुमारे 11.4 दशलक्ष नोंदणी प्राप्त झाल्या होत्या. त्याच्या तुलनेत 12.6 दशलक्ष गॅस सिलिंडर ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅसची विक्री 17 हजार टनांपेक्षा अधिक झाली असून वाहनांसाठी वापरल्या जाणार्‍या गॅसची विक्रीही 762 टनांहून अधिक झाली आहे. यावरून देशातील पुरवठा यंत्रणा सक्षम आणि सुरळीतपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सरकारने सांगितले. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतासारख्या आयातप्रधान देशावर आर्थिक ताण वाढतो. त्यामुळे ऊर्जा बचत आणि इंधनाचा संयमी वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिल्यास परकीय चलनावरील भार कमी होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही दिलासा मिळेल, असा विश्‍वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाययोजना करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी अफवा किंवा भीतीला बळी न पडता संयम राखावा आणि ऊर्जा बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

COMMENTS