नांदेड : नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (एनडीसीडी)च्या आगामी निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडली असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक

नांदेड : नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (एनडीसीडी)च्या आगामी निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडली असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. असोसिएशनचे सदस्य व फार्मासिस्ट विजय वाघमोडे यांनी मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे लेखी तक्रार दाखल करून निवडणूक प्रक्रियेत हितसंबंधांचा संघर्ष होत असल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीमुळे असोसिएशनच्या निवडणुकीभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारीनुसार, ज्या संघटनेची निवडणूक होत आहे त्याच संघटनेतील काही पदाधिकारी व सदस्यांना निवडणूक प्रक्रियेत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक राहील का, असा सवाल उपस्थित होत आहे. स्वतःच खेळाडू आणि स्वतःच पंच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. निवडणूक अधिकार्यांनी कोणत्याही एका गटाच्या प्रभावाखाली काम केल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय काही निवडणूक अधिकारी हे निवडणूक लढवणार्या उमेदवारांचे जवळचे नातेवाईक असल्याचा मुद्दाही तक्रारीत अधोरेखित करण्यात आला आहे. यामुळे मतदार यादी, मतदान प्रक्रिया किंवा इतर गोपनीय माहिती विशिष्ट उमेदवारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणुकीची निष्पक्षता धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेबाबत दिलेल्या निवेदनाची साधी पोचपावती देण्यास स्थानिक अधिकार्यांनी नकार दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. लोकशाही पद्धतीने होणार्या निवडणुकीत सदस्यांची तक्रार स्वीकारण्यास नकार देणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया काही सदस्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक कोणत्याही दबावाशिवाय, कोणाच्याही बाजूने न झुकता आणि सर्व सदस्यांचा विश्वास कायम राहील अशा पद्धतीने पार पडावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. या प्रकरणात मुख्य निवडणूक अधिकारी कोणती भूमिका घेतात आणि निवडणूक प्रक्रियेत काही बदल होतात का, याकडे आता असोसिएशनच्या सदस्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीतील प्रमुख आरोप
संघटनेतील सदस्यांनाच निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
उमेदवारांच्या नातेवाईकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग
गोपनीय माहिती फुटण्याची शक्यता व्यक्त
तक्रार निवेदनाची पोचपावती देण्यास नकार
निवडणुकीच्या निष्पक्षतेवर सदस्यांकडून प्रश्न उपस्थित
मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

COMMENTS