किनवट : किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील रेल्वे फाटक क्रमांक 11 च्या ठिकाणी महामार्गावरिल उड्डाणपूल उभारण्याच्

किनवट : किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील रेल्वे फाटक क्रमांक 11 च्या ठिकाणी महामार्गावरिल उड्डाणपूल उभारण्याच्या कामात गेल्या आठ वर्षांपासून होत असलेल्या विलंबाबाबत अखेर रेल्वे बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुधारित ’सामान्य व्यवस्था आरेख’ वेळेत सादर न झाल्यानेच हे काम रखडल्याचे रेल्वे बोर्डाने नमूद केले आहे. किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी गोकुंदा रेल्वे उड्डाणपुलाच्या संथ कारभाराबाबत व आठ वर्षांच्या विलंबाबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडेही दाद मागण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने (रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली) 31 जुलै 2026 रोजी अधिकृत कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे. रेल्वे बोर्डाचे अधिकारी विवेक भूषण सूद यांनी आमदार भीमराव केराम यांना पाठवलेल्या पत्रानुसार 11 सप्टेंबर 2024 रोजी रेल्वे व संबंधित विभागाची संयुक्त पाहणी झाली होती. 16 ऑक्टोबर 2025 रोजी रेल्वे प्रशासनाने काही अटी व टिपण्यांसह संकल्पनात्मक योजनेला मान्यता देऊन मंजुरीसाठी ’जीएडी’ सादर करण्याचा सल्ला दिला होता. आता यापुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून सुधारित आराखडा मिळणे प्रलंबित आहे. गोकुंदा रेल्वे फाटकावर तासनतास होणार्या वाहतूक कोंडीमुळे किनवट व परिसरातील नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थी गेल्या आठ वर्षांपासून प्रचंड त्रस्त आहेत. रेल्वे बोर्डाच्या या पत्रानंतर आता चेंडू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोर्टात असून पीडब्ल्यूडीचे अधिकारी तातडीने सुधारित जीएडी सादर करून पुलाच्या कामाला गती देणार की पुन्हा कागदी घोडेच नाचवले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS