किनवट - जल, जंगल आणि जमिनीच्या कुशीत फुललेल्या आदिम संस्कृतीचा गौरव आणि स्वाभिमानाचा झंकार रविवारी किनवटच्या पवित्र भूमीत घुमला. जागतिक आदिवासी द

किनवट – जल, जंगल आणि जमिनीच्या कुशीत फुललेल्या आदिम संस्कृतीचा गौरव आणि स्वाभिमानाचा झंकार रविवारी किनवटच्या पवित्र भूमीत घुमला. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून योजलेली भव्य महारॅली म्हणजे केवळ मानवी गर्दीचे प्रदर्शन नव्हते, तर ती आदिवासी अस्मितेची, हक्कांची आणि सहअस्तित्वाची एक उत्कट हुंकार यात्रा ठरली. शहरातील वीर बाबूराव शेडमाके आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिचौकांपासून निघालेला हा महारॅलीचा प्रवाह म्हणजे जणू लोकसंस्कृतीचा वाहता निर्झर होता. पारंपरिक पोशाखात नटलेल्या अबालवृद्धांच्या पाऊलांना ढोल, डफ आणि सुरनईच्या नादाने अनोखी लय दिली. तरुणींच्या ‘मांदरी’ नृत्यातील लयबद्धता अन् ‘जय जोहार’चा बुलंद जयघोष यांनी संपूर्ण आसमंत ढवळून काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राजमाता जिजाऊ चौकामार्गे निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहराला एका उत्सवपर्वात बांधून ठेवले. रॅलीचा भव्य सोहळा क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा चौकात एका विचारसभेत रूपांतरित झाला. क्रांतिकारकांच्या स्मरणाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे मंगलाचरण झाले. सभेचे अध्यक्षपद भूषवताना आमदार भीमराव केराम यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून उपस्थितांना संबोधित केले. संविधानाने आपल्याला हक्क आणि स्वाभिमानाची ढाल दिली आहे. त्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या त्यागाचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली, तरी ज्ञानाच्या बळावर आणि अभेद्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण प्रगतीचे शिखर गाठू शकतो. तरुण पिढीने शिक्षणाची मशाल हाती घेऊन स्वावलंबी बनावे. या सोहळ्याने सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुतेची सुंदर गुंफण घातली. कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे वैभव, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि संघर्षाचा इतिहास सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोहळ्यास युवा नेते संदेश केराम, आनंद मच्छेवार, दत्ता आडे, साजिद खान, के. मूर्ती, गोपीनाथ बुलबूले, डॉ. ढोले, डॉ. उत्तम धुमाळे, मारोती सुंकलवाड, दादाराव टेकाम, जनाबाई डूडुळे, तसेच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी व किनवट-माहूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मरसकोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन विजय कुमरे यांनी तर आभार विजय पेंदोर यांनी मानले. वीर बाबुराव शेडमाके उत्सव समितीने या नयनरम्य सोहळ्याचे नेटके आयोजन केले होते.

COMMENTS