शहरात सध्या महिला सांस्कृतिक ग्रुप या नावाखाली एक वेगळाच सामाजिक उद्योग तेजीत सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. सुरुवात अगदी निरागस लग्नाचे वाढदिवस,

शहरात सध्या महिला सांस्कृतिक ग्रुप या नावाखाली एक वेगळाच सामाजिक उद्योग तेजीत सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. सुरुवात अगदी निरागस लग्नाचे वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे, साखरपुडा, हळदी-कुंकू, महिला मेळावे अशा कार्यक्रमांमध्ये गाणी, नृत्य, खेळ आणि भारतीय संस्कृती जपण्याचे संदेश देत काही महिला एकत्र आल्या. सुरुवातीला लोकांनीही वा! संस्कृती जिवंत ठेवणार्या ताई ! म्हणून टाळ्या वाजवल्या.
पण हळूहळू या टाळ्यांचा आवाज थांबून कुजबुज सुरू झाली. कारण कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू झालेले हे सांस्कृतिक नेटवर्किंग आता वेगळ्याच दिशेने जात असल्याचे बोलले जात आहे. शासकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावायची, अधिकार्यांशी ओळखी वाढवायच्या, राजकीय नेत्यांबरोबर उठबस वाढवायची सेल्फी काढायचे, सर तुम्ही खूप चांगलं काम करता म्हणत जवळीक साधायची आणि मग मैत्रीचा अध्याय पुढे न्यायचा अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. अशा प्रकारचे उपक्रम विविध शहरांमध्ये व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चालत आहेत. नेमका काय प्रकार चालू आहे याबाबत शहरात वेगवेगळी चर्चा होत आहे. यात काही अधिकारीही सांस्कृतिक प्रेमी बनल्याचे सांगितले जाते. कार्यक्रमानंतर कॉफी, त्यानंतर डिनर, मग गिफ्ट, त्यानंतर सहली आणि शेवटी ही फक्त मैत्री आहे या वाक्याखाली अनेक व्यवहार सुरू असल्याचे बोलले जाते. काही जणींना महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने, ब्रँडेड पर्स, तर काहींना विशेष पर्यटन लाभल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. विशेष म्हणजे या सगळ्याला काही तथाकथित नवरोबा मंडळींचे पाठबळ असल्याचेही समजते. काही ठिकाणी महिला मंडळींचे नवरोबा वेगवेगळ्या अधिकार्यांशी मैत्री करून त्यांना कार्यक्रमांना बोलावतात हे विशेष. कधीकधी हे कार्यक्रम शासकीय विश्रामगृहात सुद्धा होतात. बाहेरून संस्कृती, परंपरा, महिला सक्षमीकरण यावर भाषणं द्यायची आणि मागून या चमूंच्या कार्यक्रमांना आर्थिक व सामाजिक बळ द्यायचे, असा आरोप दबक्या आवाजात केला जात आहे. दरम्यान, खर्या अर्थाने कला जपणार्या आणि सन्मानाने सांस्कृतिक कार्यक्रम करणार्या महिलांमध्ये मात्र नाराजी आहे. चार गाणी आणि दोन रील्सच्या जोरावर संस्कृतीचे दुकान उघडले गेले आहे, अशी टीका काहींनी केली. काही ठिकाणी तर या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष निकष असल्याची चर्चा आहे. गाणे किंवा नृत्य येते का यापेक्षा मोबाईलवर रील्स किती व्हायरल होतात, कोणत्या अधिकार्यांशी ओळख आहे, कोणत्या हॉटेलमध्ये कार्यक्रम होतात यालाच जास्त महत्त्व दिले जात असल्याचे बोलले जाते. संस्कृतीपेक्षा स्टेटस आणि कनेक्शन यांनाच जास्त किंमत मिळत असल्याने अनेक जुन्या महिला कलाकारांनी अशा ग्रुपपासून दूर राहणे पसंत केले आहे. तर काही जणांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण आता सामाजिक उपक्रमापेक्षा हायप्रोफाईल क्लब संस्कृतीकडे झुकत चालले आहे. पारंपरिक कार्यक्रमांच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत पार्ट्या, रिसॉर्ट भेटी आणि खासगी गेट-टुगेदर वाढत असल्याने समाजातही नाराजी व्यक्त होत आहे. शहरात आता एकच प्रश्न विचारला जात आहे – हे खरंच महिला सक्षमीकरण आहे का की सांस्कृतिक इव्हेंटच्या नावाखाली सुरू असलेला अधिकारी व राजकीय नेत्यांशी प्रभाव पाडण्याचा कार्यक्रम, नव्या ओळखी आणि फायद्यांचा नवा बाजार?

COMMENTS