Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपाच्या रणनीतीचा नवा अध्याय? एमआयएमचे मसूद अहमद खान विरोधी पक्षनेतेपदी; मनपा राजकारणात खळबळ

नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या सत्ताकेंद्रात काल (4 मे) एक अनपेक्षित पण दूरगामी परिणाम घडवू शकणारी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. एमआयएमचे मसूद

नांदेडच्या विकासात राजकारण नको; मुखेड एमआयडीसीला मंजुरी; जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे-उद्योगमंत्री उदय सामंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेडमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम
नांदेडात भाजपचा महाजल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी, मिठाईचे वाटप
Nanded: नांदेड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे मसूद अहमद खान यांची  निवड #NandedMunicipalCorporation #MIM #MasoodAhmedKhan @nwmcnanded

नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या सत्ताकेंद्रात काल (4 मे) एक अनपेक्षित पण दूरगामी परिणाम घडवू शकणारी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. एमआयएमचे मसूद अहमद खान यांची अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामागे भाजपाच्या सोयीचे राजकारण दडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
पूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून उपमहापौरपद भूषवलेले मसूद अहमद खान हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात होते. बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी निवडणुकीपूर्वी एमआयएममध्ये प्रवेश केला आणि आता विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाकडे ‘सत्तेच्या समीकरणांनुसार घेतलेली वळणे’ अशा दृष्टीने पाहिले जात आहे. महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंघ रावत, गटनेते महेश कनकदंडे आणि स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या उपस्थितीत खान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा सोहळा औपचारिक असला तरी त्यामागील राजकीय संदेश अधिक ठळक असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता, भाजपाकडे 45 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. शिवसेना (5), एमआयएम (14), काँग्रेस (10), वंचित बहुजन आघाडी (5) आणि राष्ट्रवादी (2) असे इतर पक्षांचे बलाबल आहे. काँग्रेस-वंचित आघाडीचे एकत्रित संख्याबळ 15 असूनही विरोधी पक्षनेतेपद एमआयएमकडे जाणे, हा राजकीय गणितापेक्षा ‘राजकीय सोय’ अधिक असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने निवडणूकपूर्व आघाडी स्थापन करून त्याची अधिकृत नोंदणीही विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर दुसर्‍या क्रमांकाचा गट म्हणून त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद मिळणे अपेक्षित होते, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या नियुक्तीविरोधात न्यायालयीन लढाईची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, एमआयएमचा विरोधी पक्षनेता भाजपासाठी तुलनेने ‘सुलभ’ ठरू शकतो, अशी धारणा सत्ताधार्‍यांमध्ये असू शकते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षाची तीव्रता नियंत्रित ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. नवीन जबाबदारी स्वीकारताना मसूद अहमद खान यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची भूमिका मांडली आहे. मात्र त्यांच्या निवडीमुळे विरोधी पक्षाची धार किती तीक्ष्ण राहील, की ती राजकीय समीकरणांमध्ये बोथट होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून अब्दुल गफार हे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असल्याची माहिती पुढे येत असून, आगामी काही दिवसांत हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS