Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्धापूर-असना महामार्गावरील अतिक्रमणांवर ‘थातूर-मातूर’ कारवाई; नागरिकांचा संताप वाढला

अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस पा

मोडाल, तर पोलीस खाक्या दाखवणार-पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
नांदेड शहरात रस्त्यावरच कायद्याची धज्जी! ट्रॅफिक पोलिसाची दादागिरी, तरुणाला उघड धमक्या; व्हिडिओ व्हायरल होताच संताप उसळला
समन्वयाच्या अभावामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण; जेसीबी चालकावर हल्ल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड

अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस पावले उचलतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून झालेली कारवाई ही केवळ दिखाऊ ठरल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. प्रत्यक्षात अर्धापूर ते असना नदीदरम्यानच्या मार्गावर आजही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे कायम असल्याचे चित्र आहे.
या मार्गावर फळ विक्रेत्यांच्या गाड्या थेट मुख्य रस्त्यावर उभ्या राहतात. त्यासोबतच अनधिकृत दुकाने, अवैध होर्डिंग्ज आणि रस्त्यालगत करण्यात आलेले बेकायदेशीर पार्किंग यामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या भागात वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत असून लहान-मोठे अपघात घडण्याची शक्यता सतत निर्माण होत आहे. अनेक वेळा किरकोळ अपघातही घडले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. अर्धापूर वळण रस्त्यावरही अतिक्रमणांचे प्रमाण वाढले असून रस्ता अरुंद झाल्याने मोठ्या वाहनांना वळण घेताना अडचणी येतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई केली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असली तरी ही मोहीम खरोखर प्रभावीपणे राबवली जाईल की पुन्हा एकदा ती कागदावरच राहील, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या मोहिमा जाहीर झाल्या, परंतु काही दिवस कारवाई करून नंतर ती थंडावल्याचे अनुभव नागरिकांनी घेतले आहेत. फक्त अतिक्रमण हटविण्याची तात्पुरती कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, याची जाणीव प्रशासनालाही झाली आहे. त्यामुळे संबंधित गावांतील लोकप्रतिनिधी, व्यापारी, फळविक्रेते आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रस्ताव आहे. नियोजित जागांवर विक्रेत्यांचे पुनर्वसन, पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे आणि रस्त्यालगत सुरक्षा उपाययोजना राबविणे, असे पर्याय चर्चेत येऊ शकतात. महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी अनेक व्यापारी व मालमत्ताधारकांची जमीन संपादित करण्यात आली होती. त्यांना शासनाकडून योग्य मोबदला देण्यात आला असतानाही काहींनी पुन्हा महामार्गाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे व दुकाने उभारल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून नियमांचे पालन करणार्‍यांमध्ये नाराजी आहे. अवैध अतिक्रमण आणि बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. यामुळे वेगाने धावणार्‍या वाहनांना अचानक अडथळे निर्माण होतात आणि अपघातांचा धोका वाढतो. विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशयोजना नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. एकूणच, अर्धापूर-असना महामार्गावरील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला असून केवळ दिखाऊ कारवाई न करता सातत्यपूर्ण आणि कठोर उपाययोजना राबविण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS