गेवराई शहरातील संजय नगर भागात मानवी आरोग्यासाठी घातक असणारी बनावट ’सिंधी’ तयार करून तिची विक्री करणार्या एका गुत्त्यावर पोलिसांनी धाड टाकली. या

गेवराई शहरातील संजय नगर भागात मानवी आरोग्यासाठी घातक असणारी बनावट ’सिंधी’ तयार करून तिची विक्री करणार्या एका गुत्त्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एका मुख्य आरोपीसह सिंधी पिण्यासाठी आलेल्या सहा ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण 4 लाख 71 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने, 1 जुलै 2026 रोजी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना गोपनीय बातमी मिळाली की, संजय नगर येथील एका घरात बनावट सिंधी विक्रीचा धंदा सुरू आहे. या माहितीवरून पोलिसांनी 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सदर घरावर अचानक छापा टाकला. छापा टाकल्यानंतर घरातील हनुमान शंकरराव माकडे (वय 57) हा ग्राहकांना बनावट सिंधी विकताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याकडून सिंधी तयार करण्यासाठी वापरले जाणारे घातक केमिकल्स, साहित्य, 205 लिटर बनावट सिंधी आणि ग्राहकांच्या मोटारसायकल असा एकूण 4,71,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही सिंधी केमिकल्सच्या मिश्रणातून बनवली जात असल्याने ती मानवी शरीरास अत्यंत अपायकारक असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे गेवराई येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 123, 274 आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या (म.दा.का.) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हनुमान माकडे याला अटक करण्यात आली असून, पुढील तपासासाठी त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. समाधान दौड करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किशोर पवार, सपोनि. अतुलकुमार लांडगे, पोउपनि. रामराव खोत आणि त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी केली आहे

COMMENTS