मुंबई: मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रश्नावरून भाजप आमदार तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. "

मुंबई: मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रश्नावरून भाजप आमदार तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. “वाघाच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर निधी न देता त्यांना मंत्रालयातील अधिकारी ताटकळत ठेवतात. अशा अधिकाऱ्यांना एक दिवसाचा कायदा करून झाडाला बांधा आणि वाघ सोडा, म्हणजे त्यांना या संघर्षातील पीडितांची व्यथा कळेल,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
वाघाच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर निधी न देता त्यांना ताटकळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आदित्यजी, या अधिकाऱ्यांना सरळ करण्यासाठी आम्हाला तुमच्याच नेत्यांची भाषा वापरावी लागते. संजय राऊत यांच्या शब्दकोशातील भाषा ऐकवल्याशिवाय हे अधिकारी ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना वठणीवर आणायचे असेल तर राऊतांच्या शब्दकोशातील भाषा वापरण्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो.”
वाघाच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर मदत न देता फाईल रेंगाळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रचंड संतापले. जोपर्यंत असा कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधत नाही, तोपर्यंत त्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळणार नाही, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे, पण मुंबईत मंत्रालयात फाईल्स घेऊन बसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य जाणवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
वन्यप्राण्यांच्या बचावासाठी कार्यरत असलेल्या प्राथमिक प्रतिसाद पथकांना (रॅपिड रिस्पॉन्स टीम) वर्षानुवर्षे निधी दिला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. “मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना संघर्षग्रस्त भागांमध्ये काम करणाऱ्या पथकांना आवश्यक निधी दिला जात नाही. मनुष्यबळ अपुरे आहेच, पण तेही पुरवले जात नाही. साधनसामग्री वेळेत उपलब्ध करून दिली जात नाही. वर्षे-वर्षे त्यांचे वेतन दिले जात नाही. मग हा संघर्ष थांबणार तरी कसा?” असा सवाल मुनगंटीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

COMMENTS