बीड जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरण मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत मागील दोन महिन्यांत गहाळ झालेले 20 मोबाईल शोधून का

बीड जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरण मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत मागील दोन महिन्यांत गहाळ झालेले 20 मोबाईल शोधून काढले आहेत. हे सर्व मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले, ज्यामुळे तक्रारदारांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या संकल्पनेतून बीड पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, प्रत्येक पोलीस ठाण्यात ’सायबर डेस्क’ स्थापन करण्यात आला आहे. मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार प्राप्त होताच, पोलीस ऑनलाईन पद्धतीने ’सी.ई.आय.आर.’ पोर्टलचा वापर करून त्यांचा शोध घेतात. गेवराई पोलीस ठाण्याने या तंत्रज्ञानाचा वापर करून विशेष कामगिरी बजावली आहे. चालू वर्ष 2026 मध्ये आतापर्यंत आयफोनसह विविध महागड्या कंपन्यांचे एकूण 40 मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत आणि ते संबंधित मालकांना परत केले आहेत. मोबाईल हरवल्याच्या तक्रारी स्वीकारण्यापासून ते ते शोधून मालकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी पोकॉ/2104 ऋषीकेश पोटे यांनी यशस्वीपणे पार पाडली. शेगाव ते गेवराई प्रवासादरम्यान मोबाईल गहाळ झालेले 67 वर्षीय प्रकाश सर्जेराव कुटे यांचा मोबाईल पोलिसांनी शोधून त्यांना परत केला. आपला महागडा मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त करत पेढे वाटून पोलीस दलाचे आभार मानले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके व गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. गेवराई पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS