Homeताज्या बातम्या

आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध

केज तालुक्यातील आनंदगाव ते पी.डी.एस. माध्यमिक विद्यालय (सारणी) हा महत्त्वाचा रस्ता सध्या ‘रस्ता’ नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसां

महिनाभरापूर्वी बांधलेल्या पुलाला भगदाडनगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले
डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम 



केज तालुक्यातील आनंदगाव ते पी.डी.एस. माध्यमिक विद्यालय (सारणी) हा महत्त्वाचा रस्ता सध्या ‘रस्ता’ नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यावरील गुडघाभर खड्ड्यांनी आणि साचलेल्या चिखलाने सामान्य नागरिक, शेतकरी आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे हाल केले असून, आता ग्रामस्थांचा संयम सुटला आहे.
केवळ एक किलोमीटरचा अडथळा, तरीही प्रशासन सुस्त आनंदगाव आणि सारणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकरी केज बाजारपेठेसाठी दररोज याच मार्गाचा वापर करतात. मात्र, केवळ एक किलोमीटरच्या अंतरासाठी येथील प्रवाशांना अर्धा-अर्धा तास खर्ची घालावा लागत आहे. रस्त्यावर खडी उखडली असून गुडघाभर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी आणि चिखल साचल्याने हा मार्ग आता ‘पांदण रस्ता’ झाला आहे की काय, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शाळेत जाणार्‍या चिमुरड्या विद्यार्थ्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर साचलेले पाणी आणि चिखलातून जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. अनेकदा दुचाकी घसरून अपघात होत असून, विद्यार्थ्यांचे कपडे आणि शैक्षणिक साहित्य चिखलात माखले जात आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची अपेक्षा असताना, संबंधित विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. एका किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धा तास लागत असेल, तर त्यापेक्षा पांदण रस्ता बरा. प्रशासनाला वारंवार निवेदने दिली, पण त्यांना लोकांच्या त्रासाचे काहीही पडलेले नाही. अनेकदा वाहने घसरून पडत आहेत, प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल पालक करत आहेत.  दरम्यान, वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने आता गावकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता केवळ विनंती नाही, तर कृती होईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रस्ता डांबरीकरण करण्याचे काम तातडीने हाती न घेतल्यास, येत्या काही दिवसांत तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आता या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासन लक्ष देते की, अपघातांची वाट पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS