Homeताज्या बातम्या

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या घरभेटीने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा शुभारंभअचूक मतदार यादीसाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण(विशेष सखोल उजळणी - एसआयआर) मोहिमेचा बीड जिल्ह्यात सोमवारी (30 जून)

अधिक मासात श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे भाविकांच्या जीवाशी खेळ? वाळू वाहतुकीमुळे संतापाची लाट
वडवणीत नालंदा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरातरुणांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन



भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण(विशेष सखोल उजळणी – एसआयआर) मोहिमेचा बीड जिल्ह्यात सोमवारी (30 जून) प्रत्यक्ष शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातील मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र(गणना स्वरूप) वितरण व पडताळणी प्रक्रियेची सुरुवात केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांनी अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येकाने बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मनोज घोडे पाटील, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार (निवडणूक) सुरेंद्र डोके यांच्यासह महसूल व निवडणूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते. बीएलओ प्रदीप येवले, संदीप शेटे, संध्या भोसले, योगेश उंदरे आणि अमोल कणसे यांनीही घरभेटीद्वारे गणना प्रपत्र भरण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांशी संवाद साधून मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेत संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा उद्देश राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत मतदाराची माहिती अद्ययावत करणे, मतदारांची ओळख निश्चित करणे, मॅपिंगमधील त्रुटी दूर करणे आणि मतदार यादी अधिक विश्वासार्ह बनविणे हा आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व बीएलओ घराघरात जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची माहिती, आधार तपशील, छायाचित्र आदी माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रांसह प्रपत्र वेळेत सादर करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, मतदार यादी हा लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि अपात्र नावांचा समावेश होऊ नये, यासाठी प्रत्येकाने बीएलओंना पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठीची जनसहभागाची मोहीम आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात 2,416 बीएलओ, 244 बीएलओ पर्यवेक्षक आणि 2,616 बीएलओ सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. हे पथक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरभेटी देऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहे. यानंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. त्यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी बीएलओंना प्रत्येक घराला भेट देऊन प्रपत्र अचूक भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे आणि कामात पारदर्शकता व वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आवश्यक माहिती उपलब्ध करून देत बीएलओंना सहकार्य केले. या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे आगामी निवडणुकांसाठी बीड जिल्ह्याची मतदार यादी अधिक अचूक, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.

COMMENTS