मुखेड: शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता पालकांकडून भरमसाठ फी आकारणार्या निकषबाह्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कडक कारवाई करा

मुखेड: शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता पालकांकडून भरमसाठ फी आकारणार्या निकषबाह्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुखेड पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. एम. पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले.
निवेदनात डॉ. रॅपनवाड यांनी म्हटले आहे की, मुखेड तालुक्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक शाळा शिक्षण विभागाच्या निकषांचे पालन न करता पत्र्यांच्या शेडमध्ये चालवल्या जात आहेत. या शाळांमध्ये टीईटी पात्र शिक्षकांची नियुक्ती नसून अपात्र शिक्षकांकडून अध्यापन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, राज्य किंवा केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम न राबवता काही खाजगी प्रकाशकांच्या पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधांचा अभाव असून शाळांचे लेखापरीक्षण व मूल्यांकन केवळ कागदोपत्रीच होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. रॅपनवाड यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारून गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. यासाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जात असून त्याचा पारदर्शक हिशोब ठेवला जात नाही. काही शाळांकडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात इतर अनुदानित शाळांच्या पटावर दाखवून शासनाच्या योजनांचा लाभ घेतला जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आरटीई अंतर्गत गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असून, त्याऐवी फी भरलेल्या विद्यार्थ्यांचीच माहिती शिक्षण विभागाला सादर केली जात असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. मुखेड तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची सखोल चौकशी करून नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केली आहे. अन्यथा पालक व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला.

COMMENTS