Homeताज्या बातम्या

खा. आष्टीकरांवर शिवसेना जिल्हाप्रमुख खराटेंचा घणाघाती हल्ला; राजीनामा देऊन पुन्हा मैदानात येण्याचे खुले आव्हान!

किनवट: खासदार नागेश पाटील आष्टीकरांची गद्दारी ही जनतेच्या विकासासाठी नव्हे, तर केवळ त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक मलिद्यासाठी आहे! जर अं

कुंभमेळा निधी गैरव्यवहारात सरकारकडून अभय कशासाठी? २२७० कोटींच्या कामांतील निविदांच्या निर्णय प्रक्रियेत मनिषाताई म्हैसकरांची भूमिका संशयास्पद
प्रशासनाचा ’कागदी’ सोहळा अन् प्रसिद्धीचा ’बडेजाव’; किनवटमधील महाशिबिरात पारदर्शकतेचा बोजवारा!
पंढरपुरात पूजा सुरू असताना जवानाची आत्महत्या; आषाढी एकादशीच्या बंदोबस्तावरील घटनेने खळबळ

किनवट: खासदार नागेश पाटील आष्टीकरांची गद्दारी ही जनतेच्या विकासासाठी नव्हे, तर केवळ त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक मलिद्यासाठी आहे! जर अंगात हिंमत आणि धमक असेल, तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवा, अशा अत्यंत तिखट आणि थेट शब्दांत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी खासदार आष्टीकर यांना जाहीर ललकारले आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना (उबाठा) गटाच्या सहा खासदारांनी गद्दारी करत शिंदे गटाची लाचारी पत्करली. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाचा समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. किनवट विधानसभेत ’ऑपरेशन टायगर’ राबवण्याच्या पोकळ गप्पा मारणार्‍या गद्दारांना चोख उत्तर देण्यासाठी, बुधवारी नगराध्यक्ष सुजाता एंड्रलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तातडीची पत्रकार परिषद वादळी ठरली. यावेळी जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आष्टीकरांच्या राजकीय खेळीचे वाभाडे काढले.

विकासाचा १५ कोटींचा निधी कमिशनसाठी प्रलंबित ठेवल्याचा आरोप

पत्रकार परिषदेत बोलताना ज्योतिबा खराटे यांचा पारा कमालीचा चढला होता. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत याच नागेश पाटील आष्टीकरांना खासदार बनवण्यासाठी स्वर्गीय प्रदीप नाईक यांनी स्वतःच्या जिवाचे रान केले. पण आष्टीकरांनी विधानसभा निवडणुकीत स्वतः भाजपला मॅनेज केले आणि प्रदीप नाईक यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचा पराभव घडवून आणला. आष्टीकरांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घोर विश्वासघात केल्याचे सांगत, विकासाचा तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी केवळ स्वतःच्या ’कमिशन’साठी प्रलंबित ठेवण्यात आला, असा थेट आणि खळबळजनक आरोप खराटे यांनी केला.

सुरक्षा बाजूला ठेवा अन् जनतेसमोर या!

आष्टीकरांना थेट आव्हान देताना खराटे कडाडले, गद्दारी करून स्वतःचे घर भरणाऱ्या आष्टीकरांमध्ये जर थोडी जरी हिंमत उरली असेल, तर त्यांनी तात्काळ खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जनतेच्या कोर्टात यावे. पोलिसांची सरकारी सुरक्षा बाजूला ठेवा आणि जनतेसमोर येऊन दाखवा. आम्ही सध्या ’जखमी शेर’ आहोत आणि जखमी शेर काय शिकार करू शकतो, हे येणारा काळच ठरवेल! इतकेच नव्हे तर, निवडणुकीव्यतिरिक्त जर आष्टीकरांनी किनवट आणि माहूर तालुक्यात पाय ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना तीव्र आणि भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट सज्जड दमच त्यांनी दिला.

दरम्यान, पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष सुजाता एंड्रलवार व युवानेते करण एंड्रलवार यांच्या अनुपस्थितीबद्दल पत्रकारांनी प्रश्न उपस्थित करताच, खराटे यांनी तात्काळ फोनवर संपर्क साधून ते पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले. या वादळी पत्रकार परिषदेला शिवसेना उबाठा पक्षाचे किनवट तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील, शहरप्रमुख प्रशांत कोरडे, श्रीराम नेमानेवार, संतोष येलचलवार, आरिफ भाटी, दत्ता कोल्हे, प्रमोद जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS