Homeताज्या बातम्या

होर्मुझ सामुद्रधुनी पार करून ‘दिशा’ भारतातनैसर्गिक वायूच्या पुरवठ्याला मोठा दिलासा

गांधीनगर : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गक्रम

अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तरक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्‍चिम आशिया पुन्हा अस्थिर
अमेरिका-इराणमधील तणाव कायम !
अमेरिकेचे इराणवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीजवळ तणाव वाढला


गांधीनगर : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गक्रमण करत भारतीय द्रवीकृत नैसर्गिक वायू वाहक जहाज ‘दिशा’ गुजरातमधील दहेज बंदरात दाखल झाले आहे. सुमारे तीन महिन्यांपेक्षा अधिक प्रतीक्षेनंतर आलेल्या या जहाजामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा आधार मिळाला असून नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबतचा दिलासा वाढला आहे. उपलब्ध माहितीनुसार, ‘दिशा’ या जहाजाने सुमारे 62 हजार 370 मेट्रिक टन द्रवीकृत नैसर्गिक वायू घेऊन दहेज येथील आयात केंद्र गाठले. शुक्रवारी सकाळी जहाजाने आपला प्रवास पूर्ण केला. कतारमधील रास लाफान येथून या वायूची लोडिंग करण्यात आली होती.
सध्या पश्‍चिम आशियातील अस्थिर परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या खेपेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऊर्जा पुरवठा अखंड ठेवण्यासाठी अशा वाहतुकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ‘दिशा’चे संचालन भारतीय जहाज वाहतूक महामंडळाच्या नेतृत्वाखालील समूहाकडून केले जात असून हे जहाज पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडसाठी भाडेतत्त्वावर कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे जहाज आखात परिसरात तीन महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षेत होते. त्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मार्गक्रमण करून भारतात पोहोचण्यात ते यशस्वी ठरले. जागतिक स्तरावर तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गावरील कोणताही अडथळा अनेक देशांच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम करू शकतो. गुजरातमधील भरूच जिल्ह्यात असलेले दहेज येथील द्रवीकृत नैसर्गिक वायू आयात केंद्र देशातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक आहे. देशाच्या नैसर्गिक वायू वितरण व्यवस्थेत या केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘दिशा’च्या आगमनामुळे औद्योगिक क्षेत्र, वीज निर्मिती प्रकल्प तसेच घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पश्‍चिम आशियातील भू-राजकीय घडामोडी आणि वाढत्या संघर्षाच्या वातावरणामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ‘दिशा’चे सुरक्षित आगमन भारतासाठी सकारात्मक घडामोड मानली जात असून ऊर्जा आयातीसाठी सुरक्षित सागरी मार्गांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ऊर्जा सुरक्षेसाठी होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गिकांपैकी एक मानली जाते. आखाती देशांमधून निर्यात होणार्‍या मोठ्या प्रमाणातील तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे या परिसरातील कोणतीही अस्थिरता जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत ‘दिशा’चा यशस्वी आणि सुरक्षित प्रवास भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी विश्‍वासार्ह सागरी मार्गांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.

COMMENTS