तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम व नव्या अणुकरारासंदर्भात चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने इराणविरुद्ध मर्यादित लष्करी कारवाई

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम व नव्या अणुकरारासंदर्भात चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने इराणविरुद्ध मर्यादित लष्करी कारवाई केल्याने मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात इराणची क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि समुद्रात सुरुंग पेरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नौकांवर अमेरिकन सैन्याने लक्ष्य साधल्याची माहिती अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी कमांडने दिली.
अमेरिकेच्या मते, ही कारवाई आत्मसंरक्षणाच्या उद्देशाने करण्यात आली. अमेरिकन युद्धनौका आणि त्या भागातील सैन्याला संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तथापि, अमेरिका युद्धविराम भंग करण्याच्या भूमिकेत नसून संयम राखत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग मानला जातो. जागतिक तेलवाहतुकीचा मोठा हिस्सा या मार्गातून जात असल्याने या परिसरातील कोणतीही लष्करी हालचाल जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक मानली जाते.
अमेरिकेचा आरोप आहे की, इराणी नौका या मार्गात सागरी सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजे आणि अमेरिकन नौदलाला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणच्या अणूकार्यक्रमावर कठोर भूमिका घेतली आहे. इराणकडे असलेले उच्च-समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द केले जाईल किंवा आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली नष्ट केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळातील कराराप्रमाणे कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारत दौऱ्यावर असताना होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही परिस्थितीत खुली राहील, असे स्पष्ट केले. जागतिक व्यापारासाठी हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून तो बंद होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अलीकडील हल्ल्यांमध्ये नुकसान झालेल्या बहुतांश इमारतींची दुरुस्ती पूर्ण झाल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. किरकोळ नुकसान झालेल्या सुमारे ९७ टक्के इमारती पूर्ववत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
इराणसोबत मवाळ करार नको: ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणसोबत अर्धवट तडजोडीचा करार स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. चांगला आणि कठोर करार झाला तरच पुढे जाऊ, अन्यथा कोणताही करार होणार नाही, असे त्यांनी म्हटले. अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटी मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले, तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजून अंतिम एकमत झालेले नाही. त्यामुळे युद्धविराम वाढवणारा अधिकृत करार अद्याप जाहीर झालेला नाही.

COMMENTS