पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण आलेला असताना, पुणेकरांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला

पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण आलेला असताना, पुणेकरांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. पुण्यात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, या नव्या दरांची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांसह घरगुती गॅस ग्राहकांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (MNGL) कडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, सीएनजीच्या दरात प्रतििकलो १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. तसेच घरगुती वापरासाठी पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या दरात ८५ पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर पुण्यात सीएनजीचा दर प्रतििकलो ९५.७५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) खरेदी खर्चात झालेली वाढ आणि जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रातील पुरवठा व मागणीतील चढ-उतार यामुळे ही दरवाढ अपरिहार्य ठरली आहे.
डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; मात्र पेट्रोल-डिझेलचे किरकोळ दर स्थिर राहण्याची शक्यता
दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या (ATF) निर्यातीवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार, डिझेलच्या निर्यातीवर प्रतिलिटर १४ रुपये, तर विमान इंधनाच्या निर्यातीवर प्रतिलिटर १२.५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि अनियंत्रित निर्यातीवर नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या घडामोडींमुळे देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशांतर्गत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कोणताही बदल करण्यात आलेला नसल्यामुळे, सध्या तरी पेट्रोल पंपांवरील किरकोळ दर वाढण्याची शक्यता नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS