विधान परिषद निवडणूक जाहीर होताच नगरसेवकांना लागली 'गोवा वारी' नांदेड : विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असून मतदार असलेल्या नगरसेवकांची मोठी चंग

विधान परिषद निवडणूक जाहीर होताच नगरसेवकांना लागली ‘गोवा वारी’
नांदेड : विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असून मतदार असलेल्या नगरसेवकांची मोठी चंगळ सुरू झाली आहे. कोणी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करत आहे, कोणी कोकणातील निसर्गाचा आनंद घेत आहे, तर काही जण हैदराबादमध्ये पंचतारांकित पाहुणचाराचा आस्वाद घेत आहेत. निवडणूक म्हटली की मतदार नगरसेवकांसाठी ही पर्वणीच ठरते, हे पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीचे रूपांतर ‘मोफत आलिशान सहलींच्या महोत्सवात’ झाल्याचे चित्र आहे.
मतदारांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांची शाही बदास्त ठेवणे, सहकुटुंब सहलीला पाठवणे आणि पंचतारांकित सुविधा पुरवणे हे काही नवीन नाही. मात्र, यावेळी नगरसेवक अधिक चतुर झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी व्हायरल झालेल्या फोटोंमुळे माध्यमांमध्ये टीकेची झोड उठली होती. त्यामुळे यावेळी सहलीचा आनंद लुटतानाचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर जाऊ नयेत, याची विशेष काळजी घेण्यात आली. तरीही राजकारणात गुपित फार काळ टिकत नाही, याची प्रचिती पुन्हा आली आहे. महिला नगरसेविकांना एकटे पाठवणे अवघड असल्याने त्यांना कुटुंबासह पर्यटनाची संधी देण्यात आली आहे.
यावर बोलताना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी, “कोणाला कुठे जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शाळांना सुट्ट्या आहेत, कुटुंब सोबत आहे, चार दिवस एन्जॉय करतील ना,” अशी प्रतिक्रिया देत या सहलींचे समर्थन केले आहे. मात्र, या वक्तव्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “निवडणुकीच्या काळात मतदार नगरसेवकांना फिरायला नेण्यावर बंदी असताना निवडणूक आयोग झोपला आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “दरवर्षी शाळांना सुट्ट्या असतात, मग तुमचे नगरसेवक दरवर्षी सहलीला जातात का?” असा टोला लगावत दानवे यांनी घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनीही निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. “मतदार नगरसेवकांशी संपर्क होत नाही, त्यांना अमिष दाखवून किंवा एका ठिकाणी ठेवून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असून हा आचारसंहितेचा भंग आहे,” असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी “विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरू आहे, पैशाशिवाय कोणी मतदान करत नाही,” असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. हे वक्तव्य सत्ताधारी पक्षातील आमदाराकडूनच आल्याने या निवडणुकीतील वास्तवावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दुसरीकडे, देगलूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या गोवा दौऱ्याने चांगलीच रंगत आणली आहे. गोव्याच्या एका निसर्गराम्य समुद्रकिनाऱ्यावर नाचत, गात आणि मौजमजा करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या सहलीची गुप्तता उघडी पडली. महायुतीचे नगरसेवक कुटुंबासह सहलीवर गेले असताना राष्ट्रवादीचे नगरसेवकही गोव्याच्या वाळूत रमल्याचे दिसून आले. देगलूर नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असून १५ नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांसह मोठा ताफा या सहलीत सहभागी झाल्याची चर्चा आहे. समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटताना एका उत्साही नगरसेवकाला व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

COMMENTS