श्रीगोंदा : येथे कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क

श्रीगोंदा : येथे कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीसंदर्भातील विविध महत्त्वाच्या आणि तांत्रिक विषयांवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाणी फाउंडेशनच्या वतीने ‘जय किसान’ गटाच्या माध्यमातून पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यानंतर खरीप हंगामासाठी घरगुती पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी आणि तूर बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षणासाठी योग्य पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी ‘प्रकाश सापळ्यांचा’ (Light Traps) वापर कसा करावा, याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन ‘एल निनो’ परिस्थिती आणि पावसाच्या आगमनानुसार पेरणी कधी करावी, याविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर वैयक्तिक बियाण्यासाठी तसेच बाजरी प्रकल्पांतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा, याबाबत कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे तालुका मेंटोर सचिन गोडसे यांनी पाणी संवर्धन आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकृष्ण आरकस यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले. या प्रसंगी परिसरातील जय किसान गटाचे अध्यक्ष, सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS