अहिल्यानगर : मागील भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमार

अहिल्यानगर : मागील भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमारास राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात घडली. भरदिवसा झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे राहुरी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०२६ रोजी राहुरी शहरातील बाजार समितीसमोर दोन गटांमध्ये तुफान मारहाण झाली होती आणि याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला केल्याची चर्चा आहे. योगेश ऊर्फ डॉन चोपडे (रा. राहुरी खुर्द) हा युवक रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून राहुरीहून राहुरी खुर्दकडे जात होता.
त्यावेळी जुन्या बसस्थानक परिसरात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्याला रस्त्यात अडविले. त्यानंतर अक्षय बाबासाहेब गोपाळे (रा. बारागाव नांदूर) याने योगेशवर धारदार चॉपरने अचानक सपासप वार केले. या हल्ल्यात योगेशच्या शरीरावर तीन ते चार गंभीर वार झाले. मात्र, त्याने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यामुळे त्याचा जीव वाचला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी योगेशला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

COMMENTS